वरचे बांधण येथील शिवाई देवी मंदिर नवरात्रोत्सवासाठी सज्ज
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील पोयनाडपासून जवळच असलेले वरचे बांधण येथील ऐतिहासिक आणि शिवकालीन शिवाई देवीचे मंदिर शारदीय नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाले आहे. या शिवाई देवी मंदिराला शिवकालीन परंपरा असून ते अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पोयनाड परिसरासह संपूर्ण रायगड जिल्ह्यासह, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक सह राज्यातून येथे भक्त देवीच्या दर्शनासाठी येत असतात. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या ही मोठी असते. प्रामुख्याने या नवरात्रोत्सवात शिवाई देवीची ओटी भरण्यासाठी महिला मोठ्या संख्येने येथे येतात. या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसराची स्वच्छता आणि मंदिराची रंगरंगोटी केली असून मंदिरावर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. १० दिवसांत भाविकांना देवीचे दर्शन मिळण्यासाठी चोख असे नियोजन करण्यात आले आहे. भजने, नाच मंडळे यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
.............
सर्वपित्री अमावस्येला खवय्यांचा मांसाहारावर ताव
पोयनाड (बातमीदार) : पितृपक्षाची समाप्ती भाद्रपद अमावस्या या दिवशी असल्याने आपल्या पितरांना व पूर्वजांना गोडधोड जेवण तयार करून कागावळ ठेवण्याची प्रथा आहे. या निमित्ताने पोयनाड पंचक्रोशीतील विविध ठिकाणी खवय्यांची मांसाहाराच्या खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी या दहा दिवसात बरेच जण नवरात्रीचा उपवास करतात. यंदा सर्वपित्री अमावस्या रविवारी आल्याने मटण, चिकन, मासे खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. पहाटे पाच वाजल्यापासूनच मटण आणि चिकन खरेदीसाठी मोठी रांग दुकानाबाहेर दिसून आली. तसेच अनेकांनी पापलेट, सुरमई, कोळंबी, सुरमई, हलवा यासारखी मच्छी खरेदी केली तर काहींनी गावठी कोंबडी व बॉयलर कोंबडीच्या चिकनला पसंती दिली. पुढील दहा दिवस नवरात्रीचा उपवास असल्याने अनेक खवय्यांनी रविवारचा आणि त्यातही सर्वपित्री अमावस्येचा मुहूर्त साधत मांसाहारावर ताव मारला.
...............
वसंत चौलकर यांचे निधन
अलिबाग (वार्ताहर) ः शहरातील रामनाथ येथील रहिवासी तसेच अलिबाग नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष वसंत चौलकर यांचे रविवारी (ता.२१) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. वसंत चौलकर हे अलिबाग नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष होते. शिवाय ते एक लेखक म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांचे अनेक लेख वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचा अंत्यविधी रामनाथ येथील स्मशानभूमीत करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
..............
डॉ. अनुपमा धनवडे यांचे निधन
पेण (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील पहिल्या हिंदीमधून पीएचडी झालेल्य डॉ. अनुपमा दिलीप धनावडे यांचे नुकतेच निधन झाले. विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, संचलित डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, पेण येथे बरीच वर्षे त्या प्राचार्य म्हणून कार्यरत होत्या. पीएचडी कोर्स पेणला व्हावे म्हणून त्यांनी खूप परिश्रम घेतले. शेवटी मुंबई विद्यापीठाने पीएचडी सुरू करण्यास डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाला परवानगी दिली. रायगडमधली अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. पीएचडी मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याबद्दल आदर्श शिक्षिका शिक्षक रत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते. वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात हळहळ केली जात आहे.
............
रोह्यात जिल्हास्तरीय हॉलिबॉल स्पर्धेला प्रतिसाद
रोहा (बातमीदार) ः रोहा मोहल्ला यंग हॉलिबॉल ग्रुपच्या वतीने रोहा अंजुमन उर्दू हायस्कूलच्या भव्य पटांगणावर रविवार (ता.२१) रोजी एकदिवसीय हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यासहित मुंबई व रत्नागिरी जिल्ह्यातील हॉलिबॉल संघांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून नगर पालिकेचे माजी गटनेते महेंद्र गुजर यांच्याहस्ते या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख अथिती म्हणून रोहा अंजुमन उर्दू हायस्कुलचे चेअरमन अ. कादीर रोगे, वरचा मोहल्ला जमात कमिटी सदस्य इम्तियाज नाडकर, रेवा सदस्य अजीज महाडकर, अमीन तुळवे, अकिब महाडकर, मिहीर शृंगारपुरे, अकील रोहवाला, अरफात कडू यांच्या समवेत हॉलिबॉल खेडाळू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...............
सानेगाव आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गोवर रूबेलाचे लसीकरण
रोहा (बातमीदार) : तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सानेगाव येथे शुक्रवार (ता.१९) रोजी गोवर रूबेलाचे विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे यांच्या संयुक्त विद्यमाने आश्रम शाळेतील एकूण १०३ विद्यार्थ्यांना लसीची एक अतिरिक्त मात्रा देण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी साळुंखे, रा. जि. प अलिबाग पर्यवेक्षिका रावल, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील शांताराम घरत यांनी सानेगाव आश्रम शाळेमध्ये लसीकरण सत्राला सदिच्छा भेट दिली. मुख्याध्यापक मधुकर फसाळे यांच्या योग्य नियोजनामुळे वेळोवेळी विद्यार्थ्यांकडे बारकाईने लक्ष दिले जात असल्याने डॉक्टरांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आर. एम. पवार, आरोग्य सहाय्यक पवार, आरोग्य सहायिका शोभा पवार, कांचन तेलंगे, ताडलेकर, आरोग्य सेवक महेश येरोलकर, योगेश अभिनव, आशिष दसरे व अमोल आदी सर्व कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.