प्रतापगडावर दोन घटस्थापनेची शिवकालीन परंपरा
३६२ वर्षांचा अखंड वारसा; नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रम
पोलादपूर, ता. २१ (बातमीदार) ः महाबळेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक प्रतापगड किल्ला अनेक शौर्यगाथा, विजय-पराजय आणि धार्मिक परंपरांचा साक्षीदार आहे. येथे असलेल्या भवानी माता मंदिरातील घटस्थापना विशेषत्वाने उल्लेखनीय मानली जाते. महाराष्ट्रातील अन्य मंदिरांपेक्षा भिन्न अशी ही परंपरा आजही जतन केली जाते. नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी प्रतापगडावर दोन घट बसविण्यात येतात आणि या परंपरेला तब्बल ३६२ वर्षांचा अखंड वारसा लाभला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा पराभव केल्यानंतर भवानी मातेसाठी प्रतापगडावर मंदिर उभारले. महाराजांनी हिमालयातून शाळीग्राम शिळा आणून अष्टभुजा महिषासूरमर्दिनी रूपातील भवानी मातेस प्रतिष्ठापित केले. मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापन १६६१ मध्ये झाले. त्यानंतरपासून किल्ल्यावर नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. शिवरायांचे पुत्र राजाराम महाराज यांनी भवानी मातेला हिंदवी स्वराज्य अबाधित राहावे, असा नवस केला होता. या नवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ देवीच्या नावाने एक आणि राजाराम महाराजांच्या नवसासाठी दुसरा अशा दोन घटांची स्थापना करण्याची परंपरा सुरू झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे जिथे दोन घट बसविले जातात.
.................
या काळात प्रतापगडावर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चौथ्या माळेला मशाल महोत्सव, पाचव्या माळेला शिवमूर्तीची मिरवणूक, अष्टमीला घागरी फुंकणे आणि नवमीला पालखी मिरवणूक काढली जाते. भवानी मातेच्या मंदिराचे किल्लेदार अभय हवलदार सांगतात, प्रतापगडावरील घटस्थापनेला परंपरेची किनार असून, साडेतीनशे वर्षांहून अधिक काळ या परंपरेचे जतन केले जात आहे. यंदाही २२ सप्टेंबर रोजी ध्वजारोहण, घटस्थापना आणि महाआरतीने नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. २६ सप्टेंबर रोजी पालखी मिरवणूक आणि सप्तशती पाठ, २७ सप्टेंबर रोजी पारंपरिक मशाल उत्सव, तर २८ सप्टेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन होईल. १ ऑक्टोबरला खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शतचंडी यज्ञ होणार आहे. महोत्सवाची सांगता २ ऑक्टोबर रोजी पालखी मिरवणूक, सोने लुटण्याचा ले, ढोल-लेझीमचा गजर, आतषबाजी आणि सेवकांचा सन्मान सोहळा याने होईल.