बोईसर, ता. २१ (बातमीदार) : सफाळे पश्चिम येथे आज रविवारी (ता. २१) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून सहा दुकाने जळून खाक झाली. प्राथमिक माहितीनुसार, एका दुकानातील फ्रीजमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली.
पहाटेच्या वेळी अचानक लागलेल्या आगीमुळे व्यापारीवर्गात मोठी धावपळ उडाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला; मात्र तोपर्यंत दुकाने जळून मोठे नुकसान झाले होते. या आगीत लाखोंचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी पोलिस, अग्निशमन यंत्रणा व संबंधित यंत्रणा दाखल होऊन पुढील तपास सुरू आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. या भीषण आगीत दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यापूर्वीही सफाळे येथील बाजारपेठेत जयदीप इमारतीमध्ये रात्रीच्या सुमारास आग लागली होती. आगीत चार दुकाने जळून खाक झाली होती.