पालघर, ता. २१ : जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या ३८ शाळांमध्ये बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे प्रकरण आता वादात सापडले आहे. एका संचाची किंमत दोन ते तीन लाख असताना त्याची खरेदी नऊ लाखांच्या जवळपास झाली आहे. त्यामुळे या खरेदी प्रक्रियेत मोठा घोटाळा उघड झाला होता. जिल्हा नियोजन विभागाकडून या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक असताना कंत्राटदाराला देयक अदा करण्यासाठी शिक्षण विभागाकडून कॅमेरे बसवले की नाही, याबाबत अहवाल देण्यासाठी सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण आले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी जिल्हा परिषदेला सांगण्यात आले होते, मात्र जिल्हा परिषदेने काही कारणास्तव हे कॅमेरे व त्याची प्रक्रिया जिल्हा नियोजन विभागाने करावी, असे सुचवले. या प्रकारानंतर जिल्हा नियोजन विभागाने ३८ शाळांसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची खरेदी प्रक्रिया राबवली. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा संच शाळांमध्ये बसवण्याचे कार्यारंभ आदेश जिल्हा नियोजन विभागामार्फत देण्यात आले.
काही शाळांमध्ये हे संच कार्यान्वित आहेत. त्यानंतर हे संच तपासण्याचे व नियमानुसार त्यांची वस्तुस्थिती काय आहे, याबाबत शिक्षण विभागाला अवगत करणे आवश्यक असताना कॅमेरे बसवले किंवा नाही, हे केवळ समजण्यासाठी नियोजन विभागाने अहवाल मागवला. त्यानंतर व्हीजेटीआय संस्थेमार्फत ३८ शाळांवर पाहणी करून तांत्रिक बाबी तपासण्यात आल्याचे नियोजन विभागाने म्हटले, मात्र या संस्थेचे कोणीही प्रतिनिधी तांत्रिक तपासणीसाठी आले नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
शिक्षण विभागाला कल्पना नाही
कमी किमतीचे कॅमेरे जास्त किमतीला खरेदी केले गेले, याची चौकशी होणे अपेक्षित आहे, मात्र नियोजन विभागाने चौकशी करण्याचे सोडून कंत्राटदाराचे देयक अदा करण्यासाठी शिक्षण विभागाकडून अहवाल मागवला आहे. विशेषतः हे कॅमेरे बसवल्यानंतर व्हीजेटीआय संस्थेचे निकष, नियम, मापदंड, ठेकेदार-जिल्हा नियोजनचा करार शिक्षण विभागाला देणे आवश्यक असताना त्याबाबतची कोणतीही माहिती शिक्षण विभागाला नाही.
निविदा प्रक्रियेची नियमावली, निकष, मापदंड याबाबत शिक्षण विभागाला माहिती नाही, मात्र कॅमेरे संच बसवले किंवा नाही, याबाबतचा अहवाल मागविण्यात आला आहे.
- सोनाली मातेकर, शिक्षणाधिकारी, पालघर जिल्हा परिषद (प्राथमिक)
व्हीजेटीआय संस्थेच्या म्हणण्यानुसार कॅमेरे संचाच्या तांत्रिक बाजू तपासलेल्या आहेत. शिक्षण विभागाने केवळ ते बसविलेत किंवा नाही, याचा अहवाल द्यायचा आहे.
- प्रशांत भामरे, जिल्हा नियोजन अधिकारी, पालघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.