अलिबागच्या रस्त्यावर कचऱ्याचे डम्पिंग
दुर्गंधीमुळे नागरिकांसह पर्यटकांना त्रास; उपाययोजना करण्याची मागणी
अलिबाग, ता. २१ (वार्ताहर) ः अलिबाग शहरातून रेवदंड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर श्रीबाग येथे नगर परिषदेचे डम्पिंग ग्राउंड आहे. आधीच येथील कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच आता या रस्त्याकडेला, खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा कचरा आणून टाकण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांसह पर्यटकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याबाबात नगर परिषद प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
अलिबाग शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे. शहरातील गोळा केलेला कचरा अलिबाग- रेवदंडा रस्त्यावरील श्रीबाग येथे असलेल्या नगरपरिषदेच्या डंपिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात येतो. शहरासह आजूबाजूच्या दोन ते तीन ग्रामपंचायतींचा कचराही या ठिकाणी टाकण्यात येतो. त्यामुळे अनेक वेळा वाढत्या कचऱ्याचे योग्य प्रकारे नियोजन करताना नगर परिषद प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. पावसाळ्याच्या दिवसात हा कचरा कुजून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. त्यातच या ठिकाणी असलेल्या खाडीकिनारीही आजूबाजूच्या परिसरातील नागरिकही पत्रे, कपडे, ओला कचरा, टायरसह हातगाडी विक्रेते फुले, भाजीच्या कचरा टाकतात. त्यामुळे दुर्गंधीत आणखीनच भर पडते. याचा येथील प्रवास करणाऱ्या नागरिकांसह पर्यटकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे याबाबत नगर परिषद प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरीत आहे.
................
चैकट :
दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न
डम्पिंग ग्राउंड व रस्त्याच्या कडेला पडलेल्या कचऱ्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच भटके श्वान व गुरे हा कचरा रस्त्यावर पसरवत असून, पावसाळ्याच्या दिवसात दुर्गंधीत आणखी भर पडत आहे. शिवाय रात्रीच्या वेळी भटक्या गुरांसह श्वानांचा त्रास दुचाकीस्वारांसह वाहनचालकांना करावा लागतो. अनेक वेळा रात्रीच्या वेळी श्वानांचा येथील नागरिकांना हल्लादेखील झाला आहे.
.............
व्यापक जनजागृती व नियमांची अंमलबजाणी गरजेची
शहर स्वच्छ ठेवणे, रस्त्यांवरील कचरा उचलणे ही केवळ स्वच्छता कामगारांची जबाबदारी आहे, ही विचारसरणी बदलण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. यासाठी व्यापक जनजागृती व नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी समजून आपल्या घराप्रमाणेच आपल्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय प्रशासनाकडूनदेखील कचरा कोठेही टाकू नये, असे आवाहन करण्यात येते, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.