अतिदुर्गम भागात धान्य वाटप
विरार, ता.२१ (बातमीदार) : हाताला काम नसल्यामुळे आर्थिक परिस्थितीचा सामना करणाऱ्या जव्हार तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील कातकरी व आदिवासी ३५० कुटुंबांना रामलाल जे. बगाडिया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष देवकीनंदन जी बगाडिया मुंबई यांच्यातर्फे रामलाल जे. बगाडिया यांच्या स्मरणार्थ धान्य वाटपाचा कार्यक्रम कॉलनी पाडा येथे पार पडला. हा कार्यक्रम जूचंद्र येथील शिव छत्रपती समाज सेवा मंडळाच्या सहकार्याने संपन्न झाला. बगाडिया ट्रस्टचे सेवक अनिल सिंग यांच्या हस्ते जव्हार तालुक्यातील कॉलनी पाडा, कडव्याचीमाली, खडकीपाडा येथील ३५० कुटुंबांना तांदूळ, डाळ, कडधान्य, तेल, मीठ, हळद, मसाला, पोहे, गुळ, साखर, चहापावडर, साबण, थंडा, टॉवेल, बिस्किट, इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास शिव छत्रपती समाज सेवा मंडळाचे संस्थापक पुरुषोत्तम पाटील, मिलिंद पाटील, धर्माजी म्हात्रे, भास्कर चौधरी उपस्थित होते. पुरुषोत्तम पाटील यांनी उपस्थित महिलांना आरोग्य, शिक्षण, व्यसनमुक्ती, सामाजिक कर्तव्य, अंधश्रद्धा या विषयावर बहुमोल मार्गदर्शन केले.