भ्रष्टाचाराविरोधात प्रतीकात्मक तिरडी यात्रा आंदोलन
माहिती अधिकारच्या शेकडो कार्यकर्ते, नागरिकांचा सहभाग
विरार, ता. २१ (बातमीदार) ः वसई-विरार शहर महापालिकेतील अनियमित कारभार व व त्यातील भ्रष्टाचाराविरोधात प्रतीकात्मक तिरडी यात्रा आंदोलन विराटनगर हिंदू स्मशानभूमीतून महापालिका मुख्यालयापर्यंत करण्यात आले. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पालघर जिल्हाध्यक्ष महेश कदम यांच्या नेतृत्वातील या आंदोलनात नागरिक व महासंघाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मागील काही वर्षांत वसई-विरार महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे अंमलबजावणी सक्त संचालनालयाने अनेक अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केलेली आहे. या चौकशीमुळे पालिकेच्या कारभारात शिस्तबद्धता व जरब निर्माण होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना होती. प्रत्यक्षात पालिकेच्या कारभारात सुधारणा झालेली नाही. किंबहुना हा भ्रष्टाचार अधिकाधिक वाढत असून सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसुविधांवर त्याचा परिणाम होत आहे. शिवाय करदात्या नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांचे पालिका अधिकाऱ्यांनी शोषण चालवलेले आहे. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने हे आंदोलन पुकारले होते. दरम्यान, तिरडी यात्रा आंदोलनासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने महापालिका प्रशासनाला कल्पना दिलेली होती. त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या कारभारात सुधारणा करणे अपेक्षित होते; परंतु महासंघाच्या मागण्यांची पूर्तता त्यांनी केलेली नाही आणि त्यामुळे हे आंदोलन पुकारण्यात आले होते.
दरम्यान, शहरांतील स्मशानभूमींची दुरवस्था, लाकडांची टंचाई, रस्त्यावरील खड्डे आणि निधीचा अपव्यय, शहरात वाढलेला अनधिकृत बांधकामांचा पूर, माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन, चुकीच्या पद्धतीने जनमाहिती अधिकारी नियुक्त करणे, कर्मचाऱ्यांचे गैरप्रकार, चार निलंबित ठेका अभियंता यांनी पालिकेची प्रतिमा मलिन करूनही त्यांना पुन्हा सेवेत दाखल करून घेणे, जीर्ण अनधिकृत इमारतींचा प्रश्न, आरोग्यसेवांचा अभाव अशा विविध मागणी आणि समस्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. प्रसंगी महापालिका अधिकारी आणि त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून पालिका परिसर दणाणून सोडला.
माहिती अधिकार महासंघाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका पायरीपाशी बसून जोरदार घोषणाबाजी करीत मुख्यालयात येणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना अडवून धरले. त्यामुळे महापालिका उपायुक्त दीपक झिंझाड यांनी कार्यकर्त्यांना मुख्यालयात येऊन निवेदन देण्यास पाचारण केले; परंतु कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यालयाखाली येऊन निवेदन स्वाकारावे, असा उलट निरोप धाडला. त्यामुळे काही काळ अधिकारी-महासंघ कार्यकर्त्यांत तणाव निर्माण झाला. सरतेशेवटी उपायुक्त दीपक झिंझाड यांना खाली येणे भाग पडले. त्यांनी महासंघाच्या कार्यकर्त्यांना आश्वस्त करीत त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर आंदोलनाची सांगता झाली.
कोट
भ्रष्टाचाराविरोधात काढलेली प्रतीकात्मक तिरडी यात्रा आंदोलन हे असंतोषाचे ज्वलंत उदाहरण आहे. पालिकेच्या निष्क्रिय आणि भ्रष्ट कारभाराला नागरिकांनी आता थेट आव्हान दिले आहे. या आंदोलनातून पारदर्शकतेची आणि जबाबदारीची मागणी अधिक तीव्र झाली आहे. जर प्रशासनाने सुधारणा केली नाही तर पुढील काळात अधिकाऱ्यांना फार मोठ्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल.
- महेश कदम, जिल्हा अध्यक्ष, माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन, वसई-विरार शहर
कोट
महासंघाच्या कार्यकर्त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे.
- दीपक झिंझाड, उपआयुक्त, वसई-विरार महानगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.