आई गोवर्धनींचा आजपासून जागर
नवी मुंबईतील पेशवेकालीन मंदिरात नवरात्रोत्सव
तुर्भे, ता. २१ (बातमीदार) : नवी मुंबईतील ३०० वर्षांपूर्वीचे पुरातन पेशवेकालीन मंदिर म्हणून आई-गोवर्धनी माता मंदिराचा नावलौकिक आहे. त्यामुळे ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात आजपासून नवरात्रोत्सव रंगणार आहे.
नवी मुंबईतील आई गोवर्धनी माता मंदिर सोनार, ब्राह्मण, आगरी-कोळ्यांची कुलदेवता आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी अशी आई गोवर्धनी मातेची जनमानसात ख्याती आहे. मंदिर परिसरात निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेली आहे. मंदिराच्या पाठीमागे विस्तीर्ण असा समुद्र लाभलेला असून सोमवारपासून मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना होणार आहे.
--------------------------
कार्यक्रमांची रूपरेषा
आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते सकाळी सात वाजता आई गोवर्धनी मातेचा अभिषेक व पूजा होणार आहे. तसेच भाविकांना देवीचा अभिषेक करावयाचा आहे त्यांनी नावनोंदणीसाठी आवाहन करण्यात आले आहे. तर शनिवारी (ता. २७) सायंकाळी पाच वाजता हळदी-कुंकू, बुधवारी (ता. १) सकाळी आईचा नवचंडी होमबरोबर दुपारनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे.