चक्कीनाका परिसरात सीएनजी कारला लागली; वाहतूक विस्कळित
कल्याण, ता. २१ (बातमीदार) : चक्कीनाका परिसरात श्री मलंगगड रोडवर शनिवारी (ता. २०) सायंकाळी एका सीएनजी कारला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना घडताच परिसरात घबराट निर्माण झाली आणि काही वेळातच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण आणले.
चक्कीनाका परिसरात श्री मलंगगड रोडवर सीएनजी कारमधून धूर व ज्वाळा उठू लागल्याने अग्निशमन जवानांनी रस्त्यावरील वाहतूक थांबवली व नागरिकांनाही सुरक्षित अंतरावर राखले. जवानांनी अथक प्रयत्नाने काही मिनिटांतच आग पूर्णतः विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार सीएनजी सिलिंडरमधून झालेली गळती किंवा इलेक्ट्रिकल दोष असण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींकडून वर्तवली जात होती. दरम्यान, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने परिसरातील वाहतूक बराच वेळ विस्कळित झाली होती. वाहतूक पोलिस आणि अग्निशमन पथकाच्या मदतीने वाहतूक काही वेळाने सुरळीत करण्यात आली.
‘ही’ घ्या काळजी
सीएनजी किट किंवा सिलिंडरमध्ये गळती, खराब वायरिंग किंवा इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किट हे कारला आग लागण्याच्या घटना घडण्याची प्रमुख कारणे आहेत. सीएनजी वाहनधारकांनी वेळेवर गाडीची व सिलिंडरची तपासणी करावी, अधिकृत तांत्रिक व्यक्तीकडूनच देखभाल करून घ्यावी. इलेक्ट्रिक वायरिंग सुरक्षित व व्यवस्थित ठेवत, संशयास्पद गंध किंवा धूर दिसला तर त्वरित तपासणी करावी. सीएनजी भरताना वाहन पूर्णपणे बंद ठेवा. आपत्कालीन परिस्थितीसाठी आगीची लहान उपकरणेही जवळ बाळगायला हवीत. या घटनेमुळे वाहनधारकांनी आपली वाहने खासकरून सीएनजी गाड्या काळजीपूर्वक चालवाव्यात आणि वेळोवेळी तपासणी करून संभाव्य धोक्यापासून स्वतःचा व सार्वजनिक सुरक्षिततेचा विचार करावा, असे प्रशासन आणि वाहतूक विभागाने आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.