एसएसटीची माजी विद्यार्थिनी मनाली जाधवची जागतिक झेप
वर्ल्ड सुमो चॅम्पियनशिप २०२५ मध्ये कांस्यपदक
कल्याण, ता. २१ (वार्ताहर) : एसएसटी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी मनाली जाधव हिने थायलंडच्या बँकॉक येथे झालेल्या वर्ल्ड सुमो चॅम्पियनशिप २०२५ मध्ये दमदार खेळ करत कांस्यपदक पटकावले. तिच्या या आंतरराष्ट्रीय यशाबरोबरच तिला इंडिया पोस्टमध्येही नियुक्ती मिळाली आहे. हा दुहेरी गौरव एसएसटी कॉलेजसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
मनालीने यापूर्वीही अनेक उल्लेखनीय यश मिळवले आहे. राष्ट्रीय सुमो स्पर्धेत सुवर्णपदक आणि राज्यस्तरीय ज्युडो व कुस्ती स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवून तिने स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. महाविद्यालयीन शिक्षण काळात तिने महाविद्यालयीन बेस्ट ॲथलीटचा मान पटकावत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली.
या जागतिक स्पर्धेत सुमारे ३० देशांतील ३०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. तसेच हीच स्पर्धा आशियाई सुमो चॅम्पियनशिप म्हणूनही आयोजित करण्यात आली होती. इंटरनॅशनल सुमो फेडरेशनच्या माहितीनुसार ५० हून अधिक देशांतील खेळाडूंनीही उपस्थिती लावली. मनालीच्या क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रातील कर्तृत्वामुळे गौरव वाढला असून, ती आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरली आहे.