नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या
पूजा साहित्य, कपडे आणि सजावटीच्या वस्तूंना वाढती मागणी; किमतींमध्ये १० ते १५ टक्के वाढ
नेरूळ, ता. २१ (बातमीदार) ः गणेशोत्सवाचा उत्साह संपताच आता शहरभर नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. नवी मुंबईतील बाजारपेठा देवीच्या विविध साहित्यांनी सजल्या असून, विक्रेत्यांकडे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी उसळू लागली आहे. मंदिरांमध्ये रंगरंगोटी सुरू असून, सार्वजनिक मंडळांकडून मंडप उभारणी आणि सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीची उपासना, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सार्वजनिक जागराचे आयोजन करण्यात येणार आहे. सार्वजनिक मंडळे आकर्षक सजावट करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करत आहेत, तर घरगुती पूजेसाठी महिलांकडून पूजा साहित्य, सजावटीच्या वस्तू व कपड्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे. बाजारात घटस्थापनेसाठी लागणारी मडकी, मुकुट, फेटे, दागिने, तोरण, झालर, झुंबर, धान्य, माती, दिवे यांसोबतच आकर्षक मुखवटे उपलब्ध आहेत. दुर्गामातेच्या मुखवट्यांसोबतच त्याचे दागिने, साडी, नथ आणि पेहराव यांचे कॉम्बो सेट महिलांना भुरळ घालत आहेत. विशेषतः रंगीबेरंगी साड्यांचा व दागिन्यांचा ट्रेंड कायम असून, महिलांमध्ये “नऊ दिवस नऊ रंग” या संकल्पनेची क्रेझ वाढली आहे. त्यानुसार बाजारात नऊ रंगांच्या साड्यांचे कॉम्बो सेट उपलब्ध झाले आहेत. पुरुषांसाठीही एकाच रंगाचे कुर्ते-शर्ट घेण्याची आवड वाढली आहे, तर मुलांसाठी चनिया चोली, घागरा चोली आणि धोती उपलब्ध आहेत.
पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये अगरबत्ती, धूप, कापूर, होम साहित्य, मातीचे दिवे आणि सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी आहे. पारंपरिक लाकडी टिपऱ्यांसोबतच फायबर टिपऱ्या आणि रंगीत कापडाने सजवलेल्या टिपऱ्या ग्राहकांना आकर्षित करत आहेत. जाळीदार चुनरी व रंगीबेरंगी साड्यांनादेखील मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
....................
सध्या बाजारात उपलब्ध वस्तूंच्या किमती :
देवीची साडी ८० ते ५०० रुपये, नथ ३० ते १५० रुपये, दागिने ५० ते १५० रुपये, घट ६० ते ६०० रुपये, मिक्स धान्य १० ते २० रुपये, लाकडी टोपली ८० ते २०० रुपये, नारळ ३५ ते ८० रुपये, माती १५ रुपये वाटा, मुखवटे ६० ते ४०० रुपये, फुलांच्या वेण्या ३० ते १०० रुपये आहेत. नवरात्रोत्सव हा शक्तीपूजेचा सोहळा असून, देवीभक्तांनी उत्साहात तयारी सुरू केली आहे. बाजारपेठा सणसणीत रंगतदार झाल्याने आगामी नवरात्रोत्सव आनंद, भक्ती आणि उत्साहात पार पडेल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.