यकृत दान करून पत्नींनी वाचविले एकमेकांच्या पतीचे प्राण
खारघर, ता. २१ (बातमीदार) : यकृत आजाराने त्रस्त असलेल्या दोन्ही रुग्णांच्या पत्नीने एकमेकांच्या पतीला यकृत दान करत प्राण वाचवले आहेत. सध्या या दोघांची प्रकृती चांगली असून दोघांनाही उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.
चिपळूण येथील ५३ वर्षीय व्यापारी महेंद्र गमरे आणि नांदेडमध्ये येथील ४१ वर्षीय पवन ठिगळे हे यकृताच्या आजाराशी झुंजत होते. दोन्हीही रुग्णांना कावीळ, जलोदर, अवयवांना सूज येणे, पोट फुगणे, भूक न लागणे आणि स्नायूंची झीज होणे यांसारख्या समस्यांनी त्रस्त होते. दिवसेंदिवस दोघांची प्रकृती ढासळत चालली होती. महेंद्र गमरे यांच्यावर खारघर तर पवन ठिगळे यांच्यावर पुण्यातील मेडिकव्हर रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन्ही रुग्णांच्या पत्नी या पतीला यकृत दान करण्यासाठी तयार होत्या, मात्र रक्तगट व यकृताचा आकार जुळत नसल्याने अडचणी येत होत्या. या दोन्ही रुग्णालयात डॉ. शरणकुमार नरुटे यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ म्हणून उपचार करत असल्यामुळे गमरे यांना खारघर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या वेळी रुग्ण आणि त्यांच्या पत्नींचे रक्त नमुने तपासणी केली असता रक्तगट जुळून येत असल्याने स्वॅप प्रत्यारोपण हा आशेचा किरण ठरला.
१० तासांच्या शस्त्रक्रियेत यशस्वी प्रत्यारोपण
दोघांच्या संमतीने रुग्ण महेंद्र गमरे यांच्या पत्नीने तिच्या यकृताचा एक भाग रुग्ण पवन ठिगळे यांना दान केला, तर पवन ठिगळे यांच्या पत्नीने तिच्या यकृताचा भाग रुग्ण महेंद्र गमरे यांना दान केला. दोन दाते आणि दोन प्राप्तकर्त्यांवर एकाच वेळी १० तासांच्या आत यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. डॉ. नरुटे म्हणाले, कुटुंबातील रक्तगट समान नव्हता, मात्र स्वॅप प्रत्यारोपणामुळे हे शक्य झाले आणि या रुग्णांचा जीव वाचविण्यात यश आले आहे.