मनोर (बातमीदार) : पालघर तालुक्याच्या पूर्व भागातील दुर्वेस-सावरे रस्त्यावरील ऐरंबी-एंबूर गावच्या हद्दीतील वैतरणा नदीच्या पात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी (ता. २०) दुपारी मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे आहे. मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी मनोर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मृत व्यक्तीबाबत माहिती असल्यास मनोर पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन निरीक्षक रणवीर बयेस यांनी केले आहे.