सरींच्या वर्षावात मॅरेथॉनपटू चिंब!
पाम बीचवर अभूतपूर्व उत्साहात रंगली ‘१० के रन’
नवी मुंबई, ता. २१ ः आल्हाददायी वातावरण, भुरभुरणारा पाऊस आणि हजारो धावपटूंचा जल्लोष, असा विलक्षण योग रविवारी (ता. २१) ‘सकाळ’ आयोजित ‘१० के रन’मध्ये जुळून आला. नवी मुंबईतील निसर्गसौंदर्याने नटलेल्या पाम बीच मार्गावर झालेल्या मॅरेथॉनमध्ये राज्यभरातून आलेल्या विविध वयोगटांतील धावपटूंनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत शारीरिक तंदुरुस्तीचा एक नवा अध्याय लिहिला. १०, पाच आणि तीन किमी अशा तिन्ही गटांत उत्साहाचे नवरंग उधळले गेले. अभूतपूर्व उत्साहात रंगलेल्या स्पर्धेने नवी मुंबई मॅरेथॉनमय झाली होती.
१० किमी रनमध्ये पुरुष विभागात मनिलाल गावित याने प्रथम क्रमांक पटकावला. महिलांमध्ये लक्ष्मी झा विजेती ठरली. पुरुषांमध्ये पाच किमी रनमधील विजेतेपदाचा मान युवराज रायकर यांनी पटकावला. महिलांमध्ये डॉ. इंदू टंडन यांनी विजेतेपद पटकावले.
वाचकांशी बांधिलकी, समाजप्रबोधन ते अध्यात्म असे विविध पैलू जोपासणाऱ्या ‘सकाळ’ने मॅरेथॉनच्या माध्यमातून तंदुरुस्तीचा मूलमंत्र दिला. हौशी आणि व्यावसायिक धावपटूंसह ‘सकाळ’च्या वाचकांनीही स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेला वयाचे कोणतेही बंधन नव्हते. ७३ वर्षीय शीला दासगुप्ता; तर पाचवर्षीय धैर्य पाटील अशी वयोगटाची दोन टोके पाहायला मिळाली. अनेक महिला गटागटाने धावत होत्या. धृतीमन चक्रवर्ती यांचे संपूर्ण कुटुंब स्पर्धेत उतरले होते. धावपटूंच्या पसंतीच्या पाम बीच मार्गावर झालेली मॅरेथॉन सर्वांनाच अपूर्व आनंद देऊन गेली. युवराज रायकर तर खास पुण्याहून मॅरेथॉनसाठी धावायला आले होते. चुरशीच्या शर्यतीत त्यांनी विजेतेपदावर मोहर उमटवली. कोणी पहिल्यांदाच धावत होता, तर कोणाकडे अनेक स्पर्धा धावण्याचा अनुभव होता, परंतु आजच्या मॅरेथॉनमध्ये धावताना प्रत्येक जण एकमेकांना प्रोत्साहन देताना दिसत होता. एरवी पाम बीच मार्ग मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी बहरून जातो. आज मात्र मॅरेथॉनमधील धावपटूंनी तिथे आपला ठसा उमटवल्याचे पाहायला मिळाले. पाम बीचच्या एका बाजूच्या रस्त्यावर धावपटू धावत होते; तर दुसऱ्या मार्गिकेवर गाड्यांची वर्दळ सुरू होती. तेथून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष धावपटूंवर होते. तेही त्यांना प्रोत्साहन देत होते.
तिन्ही गटांत सहभागी झालेले धावपटू आज वेगळ्याच रंगात होते. कारण ते त्यांच्या खास पसंतीच्या पाम बीच मार्गावर धावणार होते. अगदी पहाटे ५ पासूनच ते स्पर्धास्थळी दाखल होऊ लागले. आपापल्या परीने वॉर्मअप करून ते शर्यतीसाठी सज्ज झाले. झुंबा नृत्यावर मनसोक्त नाचून शरीराची मनाशी सांगड घालत त्यांनी घेतलेली धाव अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. काहींना होती विजयाची जिद्द, तर अनेकांमध्ये जाणवली शर्यतीत सहभागी होण्याची उर्मी. सरतेशेवटी तब्बल दोन-अडीच तास मॅरेथॉनरूपी पंढरीत उत्साहाची घोडदौड करत धावपटू विसावले, तरी त्यांचा उत्साह ओसंडून वाहतच होता.
...
मृण्मयीने दिले प्रोत्साहन
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे तिच्या ‘मनाचे श्लोक’ या आगामी चित्रपटाच्या टीमसह जातीने उपस्थित होती. प्रत्येक धावपटूला ती प्रोत्साहन देत होतीच; पण अगदी हसत हसत दिलखुलासपणे सेल्फीही काढत होती. त्यामुळे धावपटूंचा उत्साह अधिक वाढत होता. तरुणाईचा लाडका चेहरा आणि ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरे बक्षीस समारंभासाठी खास उपस्थित होता. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्या हस्तेही विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली आणि त्यांचा सन्मान करण्यात आला.
...
स्पर्धेचे विजेते
१० किमी ः
पुरुष - १) मनिलाल गावित (३८.३१ मि.), २) आशीष रावत (३९.३८ मि.), ३) शिवम डिगारी (३९.४२ मि.)
महिला - १) लक्ष्मी झा (४८.१४ मि.), २) विदिता मुनगी (५१.२१ मि.) ३) अनुभा अगरवाल (५१.४६ मि.)
५ कि.मी ः
पुरुष - १) युवराज रायकर (२०.३९ मि.), २) उत्कर्ष पाटील (२१.२६ मि.), ३) योगेश चौधरी (२१. ३० मि.)
महिला - १) डॉ. इंदू टंडन (२४.३० मि.), २) मुस्कान सिंग (३२.२६ मि.), ३) रमा पाटील चौगुले (३३.५८ मि.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.