भातशेतीत भरघोस उत्पादन
बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद, भातकापणीस शेतकरी सज्ज
कासा, ता. २१ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील भातशेतीत यंदा समाधानकारक चित्र दिसून येत आहे. हळवे भातपीक जवळपास तयार झाले असून, गर्वे भातपीकही चांगल्या प्रकारे बहरले आहे. त्यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, विक्रमगड, वाडा व जव्हार या तालुक्यांमध्ये भातशेती मोठ्या प्रमाणात घेतली जाते. यंदा डहाणू तालुक्यात तब्बल १५,७४३.३८ हेक्टर क्षेत्रावर भातलागवड झाली आहे. त्यात लवकर तयार होणारे म्हणजे ९० दिवसांत परिपक्व होणारे हळवे भात आता कापणीस सज्ज आहेत, तर गर्वे या १२० दिवसांहून अधिक कालावधीत परिपक्व होणाऱ्या जातींना अजून काहीसा वेळ लागणार आहे.
आतापर्यंत भातशेती उत्तम झाली आहे. काही ठिकाणी बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव दिसला होता, मात्र एकूणात पिके चांगली आहेत. आता परतीचा पाऊस जर अतिवृष्टीचा झाला नाही, तर यंदा बंपर उत्पादन मिळेल, असे स्थानिक शेतकरी भरत ठाकूर यांनी सांगितले. कृषी विभागाने केलेल्या निरीक्षणातदेखील यंदा भातपिकाची स्थिती समाधानकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. काही ठिकाणी किरकोळ रोगराई आढळली असली तरी एकुणात शेतकऱ्यांचा कलाटणीवर विश्वास वाढला आहे. डहाणू तालुक्यात पारंपरिकरीत्या पावसाळ्यात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते, मात्र वादळी वारे, पूर व रोगराईमुळे कधी कधी नुकसान होते. याउलट उन्हाळ्यात कालव्याच्या पाण्यावर घेतली जाणारी भातशेती उच्च प्रतीची आणि अधिक दर्जेदार होत असल्याने अनेक शेतकरी आता उन्हाळी भातशेतीकडे वळत आहेत.
कोट
“यंदा आम्ही कोलम, जया या जातींची लागवड केली आहे. भरदार पिके आली असून, परतीचा पाऊस जोरात झाला नाही, तर चांगले उत्पन्न मिळेल. भातशेतीनंतर आम्ही त्याच शेतात मिरची, चवळी व कारले यांसारख्या भाज्यांची लागवड करतो. यात कृषी विभागाचे मार्गदर्शन लाभते.” भातशेतीतील बहरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व आशावाद दिसून येत आहे.
रघुनाथ सुतार, स्थानिक शेतकरी