सहा हजार ३८७ ठिकाणी ‘अंबा मातेचा उदो उदो’
३३ मंदिरांसह दोन हजार ८९७ ठिकाणी रास दांडियाचे आयोजन
पोलिसांचा बंदोबस्त तैनात
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ ः शारदीय नवरात्रीला सोमवार (ता. २१)पासून सुरुवात होणार आहे. हिंदू धर्मात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरी केली जाते. यंदा कल्याण-डोंबिवलीत एकूण सहा हजार ३८७ ठिकाणी अंबा मातेचा उदो उदो होणार आहे, तर ३३ मंदिरांसह दोन हजार ८९७ ठिकाणी रास दांडिया कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. एकीकडे ठिकठिकाणी कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली आहे, तर दुसरीकडे पोलिसांचा सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. नऊ दिवसांत देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा-आराधना सेवाभावे केली जाते. नऊ दिवस उपवासही केला जातो, परंतु यंदाची नवरात्री १० दिवसांची आहे. अकराव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जाणार आहे. नवरात्रीच्या काळात तृतीया तिथी तब्बल दोन दिवस अर्थात २४ व २५ सप्टेंबर रोजी असणार आहे. त्यामुळे यंदाची नवरात्री नऊऐवजी १० दिवसांची असेल. देवीच्या मूर्तीचे विसर्जन नेहमीप्रमाणे दशमी तिथी सुरू झाल्यावर म्हणजे २ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३३ मंदिरांमध्ये नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी १४३, तर खासगी ठिकाणी दोन हजार ६२४ अशा एकूण दोन हजार ७६७ देवीच्या मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. सार्वजनिक ६३, तर खासगी ६७ अशा १३० ठिकाणी प्रतिमांची स्थापना करण्यात येणार आहे, तर सार्वजनिक १५ आणि खासगी तीन हजार ४४२ अशा एकूण तीन हजार ४५७ ठिकाणी घट/कलशांची स्थापना करण्यात येणार आहे.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
नवरात्रोत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना नये आणि कायदा शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या बंदोबस्तात दोन पोलिस उपायुक्त, तीन सहाय्यक पोलिस आयुक्त, २२ पोलिस निरीक्षक, ७५ सहाय्यक पोलिस निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक, ११ महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक, ५०२ पोलिस कर्मचारी, १६० महिला कर्मचारी, तसेच राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी तैनात करण्यात येणार आहे.