नालासोपाऱ्यात किरकोळ वादातून नायजेरियन व्यक्तीची हत्या
नालासोपारा, ता. २१ (बातमीदार) : नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर येथे शनिवारी (ता. २०) मध्यरात्री किरकोळ वादातून एका नायजेरियन तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली फोडून त्याची हत्या करण्यात आली. लकी इकेचकव उईजे (वय ३२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत अयूला बाबाजिदे बार्थलोम (वय ५०) आणि ओघेने इगेरे (वय ४७) या दोन नायजेरियन आरोपींना अटक केली आहे, तर ओडिया इझू पेक्यूलिअर (वय ५०) हा आरोपी फरार आहे. हे सर्व जण नालासोपारा येथे भाड्याच्या खोलीत राहात होते.
शनिवारी मध्यरात्री प्रगती नगरमधील मोनू किराणा दुकानाजवळ तिघा आरोपींचे आणि मृत लकी यांचे भांडण झाले. हा वाद इतका वाढला की आरोपींनी लकीच्या डोक्यात काचेची बाटली फोडली आणि त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रगती नगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भागात नायजेरियन नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्यांच्याकडून होणाऱ्या गैरप्रकारांमुळे स्थानिक रहिवासी त्रस्त असून, यावर उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत.