जीएसटी दरकपात हा सर्वसामान्यांच्या समृद्धीचा महामार्ग
आमदार प्रशांत ठाकूर यांचे मत
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २१ : केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर दरांमध्ये केलेल्या कपातीमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी झाल्याने थेट महागाईवर नियंत्रण येणार असून, ग्राहकांच्या खरेदीक्षमतेत वाढ होणार आहे. या निर्णयामुळे दैनंदिन वापराच्या वस्तू व सेवांच्या किमतीत घट, सर्वसामान्यांच्या जीवनमानात सुधारणा, बाजारपेठेत मागणी व विक्रीत वाढ, उद्योग-व्यवसायाला चालना व रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन मिळणार असून, सर्वसामान्य माणसाला थेट दिलासा मिळणार आहे, असे मत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले. अर्थतज्ज्ञांच्या मते, करदरातील कपात ही फक्त महसूल कमी करणारी नसून, ती ग्राहकांची खरेदी शक्ती वाढवून अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन बळकटी देते. त्यामुळे मोदी सरकारच्या निर्णयामुळे जीएसटी दरकपात हा सर्वसामान्यांच्या समृद्धीचा महामार्ग ठरणार आहे, असे त्यांनी या वेळी नमूद केले.
जीएसटीच्या नव्या कररचनेमुळे अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीलादेखील नवी चालना मिळणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल, असे प्रतिपादन आत्मनिर्भर भारत संकल्प व नेक्स्ट जेन जीएसटी रिफॉर्म २.० चे रायगड जिल्हा संयोजक व भाजपचे जिल्हा सरचिटणीस अॅड. प्रकाश बिनेदार यांनी पनवेल येथे केले. मार्केट यार्ड येथे प्रशांत ठाकूर व भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, आत्मनिर्भर भारत संकल्प व नेक्स्ट जेन जीएसटी रिफॉर्म २.० चे रायगड जिल्हा संयोजक अॅड. नरेश ठाकूर, सुशील शर्मा, विठ्ठल मोरे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन आदी उपस्थित होते.
सामान्य माणूस, शेतकरी, मध्यम व लघु उद्योगक्षेत्र, मध्यमवर्गीय समाजघटक, महिला आणि युवावर्गास या सुधारणांमुळे होणाऱ्या नव्या अर्थनीतीचा लाभ होईल आणि व्यावसायिकांना व्यवसाय सुलभतेचा अपूर्व आनंद उपभोगता येईल. देशातील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून नवी जीएसटी कररचना तयार करण्यात आल्याने नागरिक केंद्रित उत्क्रांतीची सुरुवात झाली असून, समाजाच्या अखेरच्या स्तरापर्यंतच्या प्रत्येक नागरिकाचे जीवनमान यामुळे उंचावणार आहे, असेही अॅड. प्रकाश बिनेदार यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.