भिवंडी, ता. २१ (वार्ताहर) : भिवंडीतील बायपास रस्ता, कशेळी-अंजूरफाटा रस्ता आणि ठाणे परिसरातील घोडबंदर रोड नेहमीच वाहतूक कोंडीत अडकलेला असतो. वाहनचालक, चाकरमानी आणि विद्यार्थ्यांना या रस्त्यांवरून प्रवास करताना अनेक गैरसोईंचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा या कोंडीचा फटका ग्रामीण भागातून ठाणे व मुंबईकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही बसत असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. या समस्येवर सरकार व वाहतूक विभागाकडून उपाय करण्यासाठी प्रयत्न होत असूनही वाहतूक कोंडी काही सुटलेली नाही.
वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी ठाणे व भिवंडी परिसरात येणाऱ्या अवजड वाहनांना दिवसा सहा ते रात्री १२ वाजता प्रवेशबंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. ही अंमलबजावणी १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत प्रायोगिक स्वरूपात होणार आहे. या बंदीमुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा, तळवली नाका, वडपे, सरवली, नदीनाका, पारोळ फाटा, चिंचोटी फाटा येथे अवजड वाहन थांबवले जाणार आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठी रांग तयार होत असून, नव्या वाहतूक कोंडीचा अधिक उद्भवण्याची भीती आहे. यामुळे संताप व्यक्त करणाऱ्या नागरिकांनी सरकार आणि वाहतूक विभागावर टीका केली आहे.
गोदाम पट्ट्यात व्यवसाय ठप्प होण्याची भीती
भिवंडीचा ग्रामीण भाग महाराष्ट्रातील सर्वांत मोठा गोदाम हब म्हणून ओळखला जातो. या भागात सुमारे ५० हजार छोटे-मोठे गोदाम आहेत, ज्यामध्ये काही वर्षांत अत्याधुनिक गोदामांची भर पडली आहे. न्हावा शेवा बंदर जवळ असल्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा माल येथे साठवला जातो. दररोज हजारो अवजड ट्रक माल चढ-उतारासाठी येतात. ज्यामुळे गोदाम व्यवसायाला चालना मिळते. येथील लाखो कर्मचारी, हमाल व माथाडी कामगार सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत कामाला लागलेले असतात. नवीन आदेशामुळे दिवसभर अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार असल्याने गोदाम मालक, ट्रकचालक आणि हमाल यांना ३६ तासांहून अधिक काळ थांबावे लागेल. यामुळे वेळेचा अपव्यय, खर्च वाढ आणि व्यवसाय ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ट्रान्सपोर्टचे मालक आणि वाहतूक व्यावसायिक सुहास नकाते यांनीही याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.