मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. २१ : मे महिन्यापासून पाऊस पडत असूनही, बदलापूरकर पाण्यासाठी त्रस्त आहेत. शहराच्या पश्चिमेकडील हेंद्रेपाडा परिसरातील पाच ते सहा मोठ्या सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठा ठप्प असल्याने साधारण पाच ते साडेपाच हजार नागरिकांना अडचण भासत आहे. १६-१७ दिवसांपासून या सोसायट्यांमध्ये पाणी येत नसल्याने नागरिक संतापले आहेत. त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
बदलापूर शहरात पाण्याची समस्या गंभीर आहे; अनेक सोसायट्यांत महिनाभर पाणी नाही. कृष्णा इस्टेट, संस्कृती, श्रीकृष्ण इस्टेट, अयोध्या नगरी, वेदांत इम्पेरियल या सोसायट्यांमध्ये जवळपास दीड हजार सदनिका आहेत. ज्यामुळे येथे रहिवाशांची संख्या पाच ते साडेपाच हजार आहे. दोन-तीन महिन्यांपासून पाणी न मिळाल्याने रहिवाशांनी एकत्र येऊन आंदोलन उभे केले. काल रात्री कृष्णा इस्टेट परिसरात हजारो नागरिक जमा झाले. त्यांनी आपली समस्या माजी नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांच्याकडे मांडली. मध्यमवर्गीय रहिवासी जे सकाळी नोकरीसाठी जातात आणि संध्याकाळी थकून घरी परततात, त्यांना पाणी नसल्याने सतत ताण जाणवत आहे.
प्रत्येक सोसायटीसाठी दररोज चार ते पाच टँकर मागवावे लागतात. टँकर प्रति २ हजार रुपये असून, दिवसाला एकच सोसायटीसाठी साधारण दहा हजार रुपये खर्च होतो. त्याही पाण्याचा दर्जा निकृष्ट असून, रहिवाशांना आरोग्याचे तक्रारी जाणवत आहेत. रोज पाणी विकत घेऊन प्यायचे आणि मजीप्राचे बिलही भरायचे, एवढे पैसे आम्ही आणायचे कुठून? असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे. आमची पाण्याची समस्या मजीप्राने सोडवली नाही तर कार्यालयाला टाळे ठोकू. संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू, असा संतप्त इशारा या रहिवाशांनी दिला आहे.
भविष्यात संकटाचा इशारा
गेल्या १५ ते २० वर्षांत बदलापूर शहर झपाट्याने वाढले आहे. शहरातील अगदी जंगल परिसरांमध्येही मोठमोठे रहिवासी संकुल उभारले गेले, मात्र वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यक मूलभूत सुविधा पुरवठा केला नाही. नियोजनाअभावी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कुळगाव बदलापूर पालिकेच्या हद्दीतील नागरिकांना पाणीपुरवठा मजीप्राकडून केला जातो; परंतु पालिका नवीन इमारतींना परवानगी देताना वाढत्या गृहसंकुलांना पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना नाहीत. परिणामी, पाणीपुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात शहर वाढत राहिल्यास पाणीसमस्या गंभीर स्वरूप धारण करेल.
पाण्याचे स्रोत आधी निर्माण करा
सध्या उपलब्ध यंत्रसामग्रीच्या नियमांनुसार १०० वर्षांहून जुना जलशुद्धीकरण केंद्र मजीप्राद्वारे बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करत आहे. पावसामुळे उल्हास नदीतील गाळ वाढल्यामुळे जलशुद्धीकरणाला अधिक वेळ लागतो, ज्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी २० टक्के पाणी कपात होते. झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा करणे सध्या शक्य नाही. लोकप्रतिनिधीकडून मिळणारा निधी फक्त पालिकेच्या सामान्य कामांसाठी वापरला जातो, पाणी समस्येच्या मूळ उपायासाठी दहा वर्षांत आमदार किंवा खासदारांकडून मजीप्राला निधी मिळालेला नाही. भविष्यात राज्य सरकारच्या मदतीने जवळपास ३५० कोटी रुपयांच्या नवीन पाणी योजनेची अंमलबजावणी होणार आहे. ती राबवल्यानंतर शहरातील ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. पालिकेने जोपर्यंत नवीन स्रोत तयार होत नाही तोपर्यंत नवीन इमारतींना परवानगी देऊ नये, असे मजीप्राचे उपअभियंता सुरेश खाद्री यांनी स्पष्ट केले.
दोन ते तीन महिन्यांपासून आम्ही पाच ते साडेपाच हजार रहिवासी पाणी समस्येला तोंड देत आहोत. रोज आम्हाला पाणी विकत घ्यावे लागते. दुसरीकडे मजीप्राला पाण्याचे बिल भरावे लागते. पाणीचोरी अथवा कुठे गळती आहे का? याचा अभ्यास करून पाणी समस्या लवकरात लवकर सोडवावी; अन्यथा उग्र आंदोलन छेडू.
- विशाल सरोदे, सोसायटी अध्यक्ष, कृष्णा इस्टेट
रोज टँकरसाठी १० हजार रुपये खर्च करावे लागते. आमचा सगळा पगार फक्त पाण्यावर खर्च होत आहे. दिवसभर कामावरून थकून भागून घरी आल्यावर पाण्याची रिकामी भांडी बघून संताप अनावर होत आहे. पाणी समस्या लवकरात लवकर सोडवावी; अन्यथा साडेपाच हजार नागरिक कार्यालयात येऊन कार्यालयाला टाळे ठोकू आणि संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासू.
- चंद्रकांत मोगर्डेकर, रहिवासी तथा सचिव, कृष्णा इस्टेट
बदलापूर : पाणी समस्येने त्रस्त रहिवाशांनी कृष्णा इस्टेट परिसरात जमा होत माजी नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांच्याकडे समस्या मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.