बदलापूर, ता. २१ (बातमीदार) : शहरातील सुविधा शून्य अवस्थेसाठी स्थानिक राजकारणी आणि माजी लोकप्रतिनिधीच जबाबदार आहेत, अशी घणाघाती टीका जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांनी केली.
बदलापूर पूर्वेकडील आदर्श विद्यामंदिरात जिजाऊ संस्थेच्या करिअर मार्गदर्शन व मोफत वह्या वाटप शिबिरात ते बोलत होते. या उपक्रमातून संस्थेने जिल्ह्यातील सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केले. ३०-४० वर्षांपूर्वीची ३०-४० हजार लोकसंख्या आता सहा लाखांवर पोहोचली; मात्र त्यानुसार पाणी, वीज, रस्ते, आरोग्य अशा मूलभूत सुविधांचा विकास झालाच नाही, असे सांबरे म्हणाले. स्थानिक राजकारणी फक्त पैसा खाण्यात व्यस्त आहेत. त्यांना सामान्य बदलापूरकरांच्या समस्यांशी काही देणे-घेणे नाही, अशी टीकाही त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे व अपक्ष म्हणून मी (सांबरे) निवडणुकीत होतो. त्या वेळी काही स्थानिक राजकारण्यांनी माझ्याकडूनही पैसे लुटले आणि आदल्या दिवशीच टांगा पलटी केला, असा आरोप त्यांनी नाव न घेता केला.
तरुणांनी घ्यावा पुढाकार
भविष्यात आरोग्यमंत्री डॉक्टर, कायदामंत्री वकील, शिक्षणमंत्री शिक्षक आणि पाणीपुरवठामंत्री अभियंता असावा. असा बदल घडवायचा असेल, तर तरुणांनी राजकारणात उतरलेच पाहिजे. नेपाळप्रमाणे भ्रष्ट सरकारविरोधी आंदोलनाची वेळ आपल्या देशात येऊ नये म्हणून तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सांबरे यांनी विद्यार्थ्यांना केले.
बदलापूर शहरातील समस्यांसाठी माजी लोकप्रतिनिधी, इतर राजकारणी जबाबदार आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याकडून शहरातील बड्या माजी लोकप्रतिनिधींनी पैसे लुटले आणि आदल्याच दिवशी टांगा पलटी केला. त्यामुळे बदलापूरकरांनी अशा धोका देणाऱ्या राजकारण्यांना घरी बसवायचे असेल तर निवडणुकीच्या वेळी चांगल्या आणि नवीन उमेदवारांना संधी दिली पाहिजे.
- नीलेश सांबरे, उपनेते शिवसेना व अध्यक्ष, जिजाऊ सामाजिक संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.