उल्हासनगर, ता. २१ (वार्ताहर) : नवरात्रोत्सवाच्या रंगतदार वातावरणात नागरिकांची सुरक्षा हीच पोलिसांची प्राथमिकता ठरली आहे. झोन ४ मध्ये पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या नेतृत्वाखाली ८०० पोलिस कर्मचाऱ्यांचा सज्ज ताफा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सजलेली ड्रोन व सीसीटीव्हीची नजर, तसेच साध्या वेषातील महिला पोलिस अशा बहुआयामी रणनीतीने यंदा नवरात्रात सुरक्षिततेचे अभेद्य कवच उभारले जात आहे.
नवरात्रोत्सव हा उल्हासनगरातील नागरिकांसाठी केवळ धार्मिकच नव्हे, तर सांस्कृतिक एकतेचे प्रतीक मानला जातो. या काळात हजारो नागरिक देवीच्या आराधनेत, तरुणाई गरबा नृत्याच्या तालात रंगून जाते. गर्दीच्या या सणात नागरिकांची सुरक्षा ही सर्वांत महत्त्वाची ठरते. यंदा झोन ४ पोलिसांनी त्यासाठी बहुआयामी तयारी केली आहे. पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सव काळात बंदोबस्तासाठी एकूण ८०० पोलिस कर्मचारी तैनात करणार आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असेल. शहरातील विविध ठिकाणी उभारलेल्या १५० गरबा मंडळांना परवानगी दिली असून या मंडळांभोवती सुरक्षा कवच उभारण्यासाठी विशेष आराखडा तयार केला आहे.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी या वेळी तांत्रिक साधनांचा आधार घेतला आहे. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे मंडप व गरबा आयोजनेवर लक्ष ठेवले जाणार असून काही ड्रोन खास करून भाड्याने आणण्यात आले आहेत. याशिवाय मंडप परिसरात उभारलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चौकस नजर ठेवली जाईल. महिला सुरक्षेला प्राधान्य देत साध्या वेषातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गर्दीत होणारी छेडछाड, अवांछित वर्तन किंवा महिलांशी संबंधित कोणतीही तक्रार त्वरित हाताळली जाईल. त्यामुळे नागरिक, विशेषतः महिला, निर्धास्तपणे उत्सवाचा आनंद घेऊ शकतील. यामुळे यंदा उल्हासनगर झोन ४ मध्ये नवरात्रोत्सव केवळ भक्तिभाव आणि रंगतदारतेतच नव्हे तर सुरक्षिततेच्या वातावरणात पार पडणार असल्याची खात्री नागरिकांना वाटू लागली आहे.
नवरात्रोत्सव हा शहरातील एकात्मतेचा आणि आनंदाचा सण आहे. नागरिक निर्धास्तपणे उत्सव साजरा करतील यासाठी पोलिसांनी व्यापक सुरक्षा आराखडा तयार केला आहे. ८०० पोलीस कर्मचाऱ्यांची तैनाती, ड्रोन व सीसीटीव्हीद्वारे पाळत, तसेच साध्या वेषातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून प्रत्येक परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवणार आहोत. गर्दीवर नियंत्रण, महिला सुरक्षा आणि शिस्तीचे पालन हे आमचे प्रमुख ध्येय आहे. नागरिकांनी कोणत्याही भीतीशिवाय, निश्चिंत होऊन उत्सवाचा आनंद घ्यावा. सुरक्षित वातावरण निर्मिती ही आमची जबाबदारी असून आम्ही पूर्ण क्षमतेने ती पार पाडणार आहोत.
- सचिन गोरे, पोलिस उपायुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.