मुंबई

थोडक्‍यात बातम्या रायगड

CD

नवरात्र महोत्सवाला उत्साही वातावरणात सुरुवात
खोपोली, ता. २२ (बातमीदार) : आजपासून संपूर्ण खोपोली व खालापूर परिसरात नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली आहे. त्‍यामुळे शहर व गावागावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. गणेशोत्सवानंतर लगेचच होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी गेले पंधरवडाभर जोरदार तयारी सुरू होती. सोमवारी देवीची घटस्थापना, पवित्र मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आणि विधीवत पूजा-अर्चा करून उत्सवाची सुरुवात करण्यात आली. या उत्सवामध्ये महिलांचा, लहान मुलांचा तसेच तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. खोपोलीत यावर्षी तब्बल ३२ पेक्षा अधिक सार्वजनिक मंडळांकडून नवरात्रोत्सव साजरा होत असून, खालापूर शहर व संपूर्ण तालुक्यात गावोगावी पारंपरिक पद्धतीने देवीची स्थापना करण्यात आली आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आरासबांधणी, सामाजिक उपक्रम आणि भजन-कीर्तनांनी मंडप गजबजले आहेत. नवरात्र महोत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी खोपोली व खालापूर पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन बैठका घेण्यात आल्या आहेत. आयोजकांना नियमांचे पालन करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, नागरिकांनी सुरक्षिततेसाठी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या महोत्सवामुळे परिसरात उत्साह व भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसभरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून रात्री आरास व दिव्यांच्या रोषणाईमुळे खोपोली व खालापूर भाग उजळून निघाले आहेत. नवरात्रोत्सव हा आनंद, ऊर्जा व भक्तिभाव यांचा संगम मानला जातो आणि यावर्षीही या महोत्सवाची जोरदार धामधूम पाहायला मिळत आहे.
....................
शिवसेनेकडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत
मुरूड (बातमीदार) : शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जंगी सत्कार समारंभ झाला. या कार्यक्रमात मुरूड तालुका शिवसेनाप्रमुख नीलेश घाटवळ, रायगड जिल्हा कोअर कमिटी सदस्य ऋषिकांत डोंगरीकर आणि रायगड जिल्हा युवक उपाध्यक्ष दीपेश वरणकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी रायगड जिल्हा उपप्रमुख भरत बेलोसे, माजी सरपंच भाई सुर्वे, मुरूड तालुका बांधकाम अध्यक्ष दिनेश मिणमिने, मुरूड शहर अध्यक्ष संदीप पाटील, महिला जिल्हा संघटिका तृप्ती पाटील, माजी नगराध्यक्ष स्नेहा पाटील, माजी नगरसेविका युगा ठाकूर, युवक नेते अमोल लाड यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कारानंतर मार्गदर्शन करताना जिल्हा उपप्रमुख भरत बेलोसे यांनी मुरूड तालुक्यातील शिवसेनेचे वर्चस्व अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची ताकद वाढवून आगामी निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी एकजूट दाखवावी. मतभेद विसरून संघटनेच्या बळकटीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी नगर परिषदेच्या निवडणुकीत अनुभवी मुरूड शहर अध्यक्ष संदीप पाटील यांच्यावरच विश्वास टाकण्यात येणार असल्याचे सूतोवाच करून संघटनात्मक निर्णय घेण्याबाबत दिशादर्शन केले गेले.
.................
माजी नगराध्यक्षासह भाजप-शिवसेनेतील नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
खोपोली (बातमीदार) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांना नुकताच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर कर्जत येथे त्यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात खासदार प्रफुल्ल पटेल आणि अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. याच कार्यक्रमात खोपोलीतील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून मोठी राजकीय उलथापालथ घडवून आणली. या प्रवेशामध्ये माजी नगराध्यक्ष व शिवसेना (शिंदे गट) चे सह-संपर्कप्रमुख डॉ. सुनील पाटील, भाजपच्या जिल्हा महिला अध्यक्ष व माजी नगरसेविका अश्विनी पाटील, माजी नगरसेविका अनिता शहा, तसेच खोपोली भाजपचे शहराध्यक्ष राहुल गायकवाड यांचा समावेश आहे. त्यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा पक्षप्रवेश म्हणजेच जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेना (शिंदे गट)चे आमदार महेंद्र थोरवे तसेच भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांना दिलेला मोठा धक्का मानला जात आहे. या राजकीय घडामोडींमुळे खोपोलीत आगामी निवडणुकीची समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद स्थानिक पातळीवर लक्षणीयरीत्या वाढल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.
..................
लुंबिणी बौद्ध विहारात वर्षावास प्रवचन मालिकेचे अकरावे पुष्प
माणगाव (वार्ताहर) : पंचशील बौद्धजन सेवा संघ, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ८४१ आणि पंचशील महिला सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने खांडपाले लुंबिणी बौद्ध विहारात वर्षावास प्रवचन मालिकेचे अकरावे पुष्प मोठ्या उत्साहात झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विकासदादा गायकवाड यांनी भूषवले. प्रमुख वक्ते म्हणून प्रबोधनकार सूर्यकांत कासे यांनी गौतम बुद्धांच्या चार आर्यसत्य व अष्टांगिक मार्गाची सविस्तर मांडणी केली. त्यांनी सांगितले की, जगात दुःख आहे आणि त्याचे मूळ कारण तृष्णा आहे. तृष्णेवर नियंत्रण ठेवल्यास दुःखाचे निवारण शक्य होते व माणूस सुखी होऊ शकतो. गौतम बुद्ध हे जगातील पहिले खरे संशोधक होते, ज्यांनी विज्ञानाधारित धर्म दिला. देव नाही, आत्मा नाही, माणूस व त्याचे कर्म हाच धर्म आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कृती, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती, सम्यक समाधी आणि सम्यक व्यायाम या आठ घटकांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास बौद्धजन पंचायत समिती अध्यक्ष चंद्रमणी साळवी, महिला संघ अध्यक्षा सुप्रिया साळवी, ॲड. विलास लोखंडे, डॉ. दिलीप साळवी, संदीप साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन संघमित्रा गायकवाड यांनी केले.
....................
खरोशी येथील केळंबादेवी नवरात्रोत्सवाला प्रारंभ
पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील खरोशी गावातील स्वयंभू श्री केळंबादेवी नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबर रोजी विधिवत घटस्थापनेसह प्रारंभ झाला. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेले हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून, नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत महाराष्ट्रभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीच्या माहेरघरातून वाजतगाजत व गुलाल उधळत पालखी सोहळा पार पडला. सायंकाळी मंदिरात देवीचा शृंगार करून भजनी मंडळांच्या गजरात पूजा-अर्चा करण्यात आली. अनेक भाविक नऊ दिवस मंदिरात मुक्काम करून देवीच्या सेवेत रममाण होतात.
शेवटच्या दिवशी दुपारी ३ ते रात्री उशिरापर्यंत देवीची भव्य पालखी संपूर्ण गावातून काढली जाते. हजारो भाविक या सोहळ्यात सामील होऊन देवीच्या दर्शनाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घेतात. तसेच भाविकांसाठी दररोज महाप्रसादाचे आयोजन केले जाते. ग्रामस्थ व मंदिर समितीकडून भाविकांच्या सोयीसाठी पाणी, प्रसाद वितरण, मुक्काम व्यवस्था आदींची काटेकोर तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे नवरात्रोत्‍सवात खरोशी येथे भाविकांचा उत्साह, भक्तिभाव आणि गर्दीचा मोठा उत्सवमय माहोल अनुभवता येत आहे.
..................
भाजप अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी लियाकत खोत
रोहा (बातमीदार) : दक्षिण रायगड जिल्ह्यात भाजप संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने पक्षाने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. चणेरा विभागातील लियाकत खोत यांची भाजप अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर नंदेश यादव यांची दक्षिण रायगड युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. लियाकत खोत व नंदेश यादव हे शेकापचे माजी आमदार पंडीत पाटील आणि तरुण नेते आस्वाद पाटील यांचे खंदे समर्थक असल्याने या नियुक्तीमुळे भाजप संघटना अधिक बळकट होणार असल्याचे मानले जाते. याच कार्यक्रमात जिल्हा महिला मोर्चाच्या कार्यकारिणीमध्येही नवीन पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये राजेश्री सानप, नंदिनी यादव, जयश्री जोशी, सीमा महाबळे यांचा समावेश आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक नेतृत्वाच्या पाठबळावर पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. आगामी निवडणुकांत दक्षिण रायगडमध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे खोत आणि यादव यांनी स्पष्ट केले.
...................
मुरूड समुद्रकिनारी इन्कॉईसतर्फे सागर स्वच्छता मोहीम
मुरूड (बातमीदार) : जी. एम. वेदक विज्ञान महाविद्यालय, तळा आणि भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा (इन्कॉईस), भूविज्ञान मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूड समुद्रकिनारी भव्य सागर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छ सागर – सुरक्षित सागर, या संकल्पनेखाली ही मोहीम पार पडली. या उपक्रमात सर एस. ए. ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी, जयभवानी मच्छीमार सहकारी संस्थेचे पदाधिकारी, कोळीबांधव तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. तटरक्षक दलाचे कमांडंट निशांत भरतद्वाज, बंदर निरीक्षक प्रमोद राऊळ, नगर परिषद अधिकारी नंदकुमार आंबेतकर, प्राध्यापक बी. एस. मोरे व आनंद तोंडले पाटील, अदानी पोर्टचे अधिकारी सत्येंद्रनाथ आदी मान्यवर उपस्थित होते. या मोहीमेत समुद्र किनाऱ्यावरील प्लॅस्टिक, कचरा व इतर प्रदूषित वस्तू गोळा करून किनारा स्वच्छ करण्यात आला. नागरिकांमध्ये समुद्र संवर्धन व पर्यावरण रक्षणाविषयी जनजागृती घडवून आणणे, हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. मोहीम यशस्वी होण्यासाठी इन्कॉईसचे अधिकारी संतोष कुमार, प्राचार्य डॉ. एस. एस. मिर्झा, प्रकाश सरपाटील, महेंद्र गार्डी, डॉ. बी. जी. भवरे आदींनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे मुरूड किनाऱ्यावर स्वच्छतेचा नवा संदेश पोहोचला आहे.
....................
महात्मा गांधी ग्रंथालयात संत मुक्ताई जयंती साजरी
पेण (बातमीदार) : महात्मा गांधी ग्रंथालय वाचनालय, पेण येथे संत मुक्ताई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संत साहित्याचे अभ्यासक व ग्रंथालय अध्यक्ष अरविंद वनगे यांनी यावेळी संत मुक्ताईंच्या जीवनकार्याचा व विचारांचा विशेष उहापोह केला. यावेळी वनगे यांनी सांगितले की, संत मुक्ताईंचा जन्म अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या घटस्थापनेच्या दिवशी झाला. योगेश्वर चांगदेवांनी मुक्ताईंना गुरू मानले होते. ज्ञानदेव पाटील ध्यानाला बसले असता मुक्ताईंच्या अभंगांनी त्यांना जीवनाचा नवा मार्ग दाखवला. त्या स्त्री चळवळीच्या आद्य प्रवर्तक होत्या, निवृत्तींचा आधार होत्या, तर ज्ञानेश्वरांसाठी सावलीसारख्या मायेचा हात होत्या. ज्ञानेश्वरी ग्रंथाची प्रेरणा ज्ञानदेवांना मुक्ताईंच्या मार्गदर्शनातूनच मिळाली, असे वनगे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navratri Aarti : नवरात्री स्पेशल श्री दुर्गा मातेच्या 5 खास आरत्या, खरे भक्त असाल तर नक्की वाचा

Siddhivinayak Temple: सिद्धिविनायक मंदिर आता आधुनिक आणि सुरक्षित होणार! नवीन सुविधा काय असणार? खर्चाचा आकडा वाचून व्हाल थक्क

Mumbai Local: सीवूड-बेलापूर-उरण मार्गावरील प्रवाशांना दिलासा! लोकलच्या आणखी २० फेऱ्या धावणार; नवं वेळापत्रक कधी लागू होणार?

IND vs PAK: Impact Player मेडल जिंकताच तिलक वर्मा पडला पाया; पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर कसं होतं भारताच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण

Karad News : पडत्या काळात कऱ्हाडमध्ये कॉंग्रेसला भरभक्कम करण्याचे नामदेव पाटील यांच्यासमोर आव्हान

SCROLL FOR NEXT