पालघर पर्यटन मदतीअभावी मागे
पायाभूत सुविधा अद्याप अपुऱ्या, शासकीय धोरणांची आवश्यकता
डहाणू, ता. २२ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन १ ऑगस्ट २०१४ रोजी नव्या पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. शहरी, सागरी, नागरी आणि डोंगरी अशी भौगोलिक परिस्थिती लाभलेल्या या जिल्ह्यात पर्यटनाच्या अनेक संधी दडलेल्या आहेत. या पर्यटनाचा विकास झाला, तर रोजगारवाढीस चालना मिळेल आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही प्रवेश मिळू शकतो, मात्र यासाठी पालघर पर्यटनाला शासकीय धोरणांची आवश्यकता आहे.
पालघर जिल्हा निसर्ग, ऐतिहासिक किल्ले, समुद्रकिनारे आणि आदिवासी संस्कृतीचा खजिना आहे. वसई, अर्नाळा, तारापूर, कालदुर्ग, कामानदुर्ग, शिरगाव इत्यादी किल्ले ऐतिहासिक खुणा दाखवतात. पुरातत्त्व विभागाने या किल्ल्यांची दुरवस्था सुधारावी व नव्या पिढीला परिचय करावा. जीवदानी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, संतोषी माता मंदिर याठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येतात, मात्र पायाभूत सुविधा अद्याप अपुऱ्या आहेत. बोहाडा, तारपा नृत्य आणि वारली चित्रकला या खास आदिवासी संस्कृतीचे प्रतीक आहेत. या कलांना जिवंत ठेवण्यासाठी भव्य वारली दालन आणि सांस्कृतिक केंद्रांची आवश्यकता आहे.
दाभोसा, काळमांडवी, हिरडपाडा हे मनमोहक धबधबे पर्यटन आकर्षणे आहेत. केळवा, नांदगाव, सुरूची बीच या समुद्रकिनाऱ्यांना मुंबईकर मोठ्या प्रमाणात भेट देतात, परंतु रस्ते खड्डेमय आहेत आणि रेल्वेची वारंवारता कमी आहे. पालघर जिल्हा परिषद अंतर्गत ‘सी’ श्रेणीतील पर्यटनस्थळांवर रस्ते, सार्वजनिक शौचालये, ऑडिटोरियम, प्रवेशद्वार अशा सुविधा उपलब्ध करून देणे.
स्थानिक रोजगारनिर्मिती आवश्यक
शेतमजूर, वीटभट्टी मजूर, मच्छीमार यांसारख्या नागरिकांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणे अपेक्षित, परंतु प्रत्यक्षात धोरणात्मक नियोजन प्रभावी होत नाही. आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय बाबींसह पर्यटनाचा भागही समाविष्ट; स्थानिक समुदायाचा सहभाग आणि पर्यटन सुविधांची सुधारणा या आराखड्यात महत्त्वाची आहे. साधे जिल्हा सामान्य रुग्णालय अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्ण मुंबई किंवा इतर शहरांवर अवलंबून राहतात.
कोट
पालघर पर्यटन वाढीस यावे यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागांना सूचना देणे, आदिवासी संस्कृती जिवंत ठेवणे, युवकांसाठी रोजगारनिर्मिती करणे, रेल्वे व रस्त्यांची सुविधा सुधारणे यावर भर देणे आवश्यक आहे.
डॉ. हेमंत सवरा, खासदार