नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २२ : नवरात्री उत्सवात आदिशक्तीच्या नऊ रूपांची पूजा होते, तशीच एक ‘कर्तृत्वशील नवदुर्गा’ दूरदृष्टी, कार्यक्षमता आणि जिद्दीच्या जोरावर उल्हासनगरमध्ये प्रशासकीय व्यवस्थेत क्रांती घडवत आहेत. आधुनिक दृष्टिकोन, तंत्रज्ञान आणि पारदर्शकतेच्या माध्यमातून शहराला नवा चेहरा देण्यात त्यांचा उल्लेखनीय वाटा आहे. उल्हासनगरच्या इतिहासात पहिल्यांदा महिला आयुक्त म्हणून त्यांनी शहराच्या प्रशासनाला नवी दिशा दिली.
मनीषा आव्हाळे यांची कथा संघर्ष, शिक्षण आणि वडिलांच्या स्वप्नाशी एकनिष्ठ राहण्याची आहे. वडिलांना काही कारणास्तव स्वतः उच्च शिक्षण सोडावे लागले, पण त्यांनी “माझी मुलगी कलेक्टर बनेल” हे स्वप्न कायम ठेवले. मनीषा यांनी चौथीनंतर बोर्डिंग स्कूल, पुण्यातील आयएएलएस लॉ कॉलेजमधून एलएलबी आणि दिल्ली येथे यूपीएससीची तयारी केली. पहिल्या प्रयत्नात ८३३ वी रँक मिळाली, पण हार न मानता २०१८ मध्ये ३३ वी रँक मिळवून त्यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. घरातील आजारपण आणि आईच्या कॅन्सरशी लढतीत त्यांनी यशस्वी होण्याचा दृढ निर्धार दाखविला.
सोलापूर जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी आणि आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले. पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शहरी विकासाला वेग दिला. उल्हासनगर महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती उल्हासनगरच्या प्रगतीसाठी सुवर्णसंधी आहे. दूरदृष्टी असलेल्या अधिकाऱ्याच्या हातात शहरी विकासाची सूत्रे आल्यास शहर फक्त वाढत नाही तर बहरते,” असे मनीषा आव्हाळे यांनी आपल्या कार्यातून दाखवले. त्यांच्या नेतृत्वाखाली १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेत उल्हासनगरने राज्यात सर्वोत्तम आयुक्ताचा सन्मान मिळविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा गौरव केला.
राज्य शासन व भारतीय गुणवत्ता परिषदेच्या मूल्यांकनात उल्हासनगरने ८६.२९ गुण मिळवून २९ महापालिकांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, पनवेल यांसारख्या महापालिकांना मागे टाकणारे हे यश, प्रगतिशील विचार आणि निष्ठेचा विजय आहे. १०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत महापालिकेच्या संकेतस्थळाचे पुनर्रचना, सायबर सुरक्षितता, पारदर्शकता आणि लोकाभिमुखतेवर भर दिला गेला. केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजनांसाठी निधी मिळवण्यात महत्त्वपूर्ण यश. ई-ऑफिस प्रणाली, तक्रार निवारणासाठी आधुनिक सॉफ्टवेअर, जनसंवाद सभा यांसह प्रशासन अधिक कार्यक्षम झाले. कार्यालयीन सौंदर्यीकरण, स्वच्छतागृह, जुने अभिलेख व्यवस्थापन, वाहन व्यवस्थापन यावरही भर दिला.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून स्मार्ट एनर्जी बिलिंग, वॉर रूम डॅशबोर्डसारखे तंत्रज्ञान राबवले गेले, ज्यामुळे खर्च नियंत्रण, कामकाजाची गुणवत्ता आणि तक्रारींवर त्वरित प्रतिसाद शक्य झाला. शहरात स्मार्ट पार्किंग, जीआयएस आधारित मालमत्ता अॅप, स्मार्ट रस्ते व चौकांचे विकासही सुरू आहेत. ‘व्हिजन ५०’ अंतर्गत भविष्यातील स्मार्ट सिटी बनवण्याचे स्वप्न अधिक जवळ आले आहे. नवरात्रीत देवीच्या सामर्थ्याला वंदन केल्याप्रमाणे आधुनिक काळात मनीषा आव्हाळे यांसारख्या स्त्रिया समाजाला खरी प्रेरणा देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगरने पारदर्शक, नागरिकाभिमुख व आधुनिक प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यामुळेच मनीषा आव्हाळे या उल्हासनगरच्या ‘कर्तृत्वशील नवदुर्गा’ ठरल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.