मुरबाड, ता. २२ (बातमीदार) : मुरबाड नगरपंचायतीतील भाजपचे १२ नगरसेवकांपैकी नऊ नगरसेवकांनी बंड करून परिवर्तन पॅनल नावाचा नवीन गट तयार केला. त्यानंतर या सदस्यांपैकी आठ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला, तर नगराध्यक्ष संतोष चौधरी एकटेच परिवर्तन पॅनलमध्ये राहिले आहेत. यामुळे सध्या सत्ता आणि बहुमत कोणाच्या हातात आहे, यावर गोंधळ उडालेला आहे.
ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे अजूनही आठ नगरसेवकांच्या शिंदे गटात प्रवेशाचा अधिकृत अर्ज पोहोचलेला नाही. त्यामुळे अधिकृतरित्या परिवर्तन पॅनलमध्ये ९ आणि शिवसेनेत पाच नगरसेवक नोंदले गेले आहेत. मुरबाड तालुक्यात भाजपचे आमदार असूनही या बंडामुळे आणि शिंदे गटात नगरसेवकांची भर पडल्यामुळे संख्याबळ १३ झाले आहे. परिणामी, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदे शिंदे गटाला जाणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, नगराध्यक्ष संतोष चौधरीच्या खुर्चीला अद्याप कोणताही धक्का बसलेला नाही.