आदिवासी समाजाने शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी किशन जावळे
पेण, ता. २० (वार्ताहर) : शासनाच्या विविध योजनांमुळे आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी मोठा मार्ग मोकळा झाला असून, या योजनांचा लाभ प्रत्येक आदिवासी कुटुंबापर्यंत पोहोचावा, असे आवाहन रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. पेण तालुक्यातील शेणे येथील आदिवासी वाडीत आयोजित धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान व आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन कार्यक्रम यांच्या शुभारंभी ते बोलत होते. या वेळी आमदार रविंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जावळे म्हणाले की, या अभियानांतर्गत गावाचा विकास आराखडा ग्रामसभेत मांडून त्यास मान्यता दिली जाईल. महसूल विभागाच्या ‘राजस्व अभियान’ व ग्रामविकास विभागाच्या ‘मुख्यमंत्री पंचायतराज अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांना जिवंत सातबारा, उत्पन्न दाखला, आधारकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र यासारखे अत्यावश्यक दाखले सहज उपलब्ध होणार आहेत. रायगड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ११३ गावांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून याची सुरुवात पेण तालुक्यातून झाली आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते अनेक आदिवासी बांधवांना आवश्यक दाखले वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे आदिवासी समाज स्वावलंबी व आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
................
जिल्हा रुग्णालयात ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियान
अलिबाग (वार्ताहर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू करण्यात आलेल्या ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ अलिबाग जिल्हा रुग्णालयात मोठ्या उत्साहात झाला. १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत आयोजित या आरोग्य उपक्रमात ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांसाठी मोफत तपासणी शिबिरे घेण्यात येत आहेत. अभियानाच्या उद्घाटनासाठी खासदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर आयोजित आरोग्य शिबिरात २९१ महिलांची तपासणी करण्यात आली. महिलांच्या तोंडाचा, गर्भाशयाचा व स्तनाच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी, रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन तपासणी, सिकलसेल निदान, क्षयरोग तपासणी, तसेच माता-बालकांच्या लसीकरणाची सोय करण्यात आली होती. खासदार पाटील यांनी महिलांचे आरोग्य सुदृढ राहणे हे कुटुंबाच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगून या अभियानातून समाजात जागृती होईल, असे नमूद केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या शिबिराला लाभल्याचे सांगितले. संपूर्ण जिल्ह्यातील ३२ केंद्रांवर हे विशेष आरोग्य शिबिरे सुरू राहणार असून मोठ्या प्रमाणावर महिला लाभ घेतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
.............
परप्रांतीय फळविक्रेत्याच्या गुंडगिरीवर मनसेची धडक कारवाई
कर्जत (बातमीदार) : शहरातील नाना मास्तर नगर परिसरात परप्रांतीय फळविक्रेत्याने स्थानिक रिक्षाचालकाला मारहाण केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. फक्त २० रुपयांच्या भाड्यावरून झालेल्या वादानंतर विक्रेत्याने रिक्षाचालकाला कानाखाली मारल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि स्थानिक नागरिकांत संताप उसळला.
यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तातडीने हस्तक्षेप करत नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. जिल्हाध्यक्ष प्रसन्न बनसोडे व शहराध्यक्ष राजेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करत नगरपरिषदेच्या पथकाने संबंधित फळविक्रेत्याची अनधिकृत टपरी जमीनदोस्त केली. या कारवाईदरम्यान परिसरातील नागरिक, रिक्षाचालक आणि मनसे पदाधिकारी उपस्थित होते. कारवाईनंतर दुकानाच्या मागील बाजूस रिकाम्या दारूच्या बाटल्या व संशयास्पद वस्तू आढळून आल्याने परप्रांतीय विक्रेत्यांमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांनी व्यक्त केले. मनसेच्या इशाऱ्यामुळे नगरपरिषद तातडीने कारवाईस उतरली याबद्दल स्थानिकांनी समाधान व्यक्त केले असून, अशा प्रकारच्या अनधिकृत टपऱ्यांवर पुढील काळातही कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.