नवरात्रोत्सवावर पावसाचे सावट!
दांडियाप्रेमींच्या उत्साहावर पाणी; अनेक मंडळांकडून शेडचा वापर
पनवेल, ता. २३ (बातमीदार) : गणपतीप्रमाणेच नवरात्रोत्सवावरही पावसाचे सावट दिसून येत आहे. त्यामुळे दांडियाप्रेमींच्या उत्साहावर पाणी फिरते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पनवेल परिसरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राजकीय पक्षाशी संलग्न असणाऱ्या मंडळाकडून यानिमित्ताने गरबा भरवण्यात येतो. सिने क्षेत्रातील विविध कलाकार, गायक या उत्सवाला भेटी देतात. बक्षिसांची खैरात आयोजकांच्या वतीने केली जाते. वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून दांडिया खेळण्यासाठी अनेक जण येतात. नऊ दिवस एक वेगळा आनंद आणि अनुभव सर्वांनाच मिळतो. हा कार्यक्रम भव्य व्हावा, या उद्देशाने संबंधित मंडळाच्या वतीने व्यवस्था केली जाते. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. मे महिन्यातच मान्सूनला सुरुवात झाली. काही दिवस उघडीप घेतल्यानंतर पनवेल परिसरात यंदा विक्रमी पाऊस झाला. बाप्पांच्या प्रतिष्ठापनेनंतरही त्याने हजेरी लावली. सोमवारपासून नवरात्रीला सुरुवात झाली. पावसालासुद्धा पुन्हा सुरुवात झाली. मंगळवारी तर प्रशासनाने रायगड जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर केला. पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा नवरात्रोत्सव अगदी जोरात आहे. परंतु पावसामुळे त्याला ब्रेक बसतो की काय, अशी एकंदरीतच वातावरणीय स्थिती आहे. त्यामुळे दांडियाप्रेमींना अडचणी येऊ लागल्या आहेत. पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे कित्येक ठिकाणी गरबाप्रेमींच्या उत्साहावर पाणी फिरले. त्यातच १० वाजेपर्यंत वेळ असल्यामुळे बऱ्याच मंडळांची मैदाने रिकामी दिसून आली. मंगळवारीसुद्धा स्थिती फारशी बदलली नाही. इतका मोठ्या प्रमाणात खर्च करून नवरात्रोत्सवात पावसाचा व्यत्यय येत असल्यामुळे मंडळाचे पदाधिकारी हिरमुसलेले दिसून येत आहेत.
.....................
चौकट
पावसातही गरबा रंगणार!
नवरात्रोत्सवात एक प्रकारचा जोश आणि जल्लोष असतो. दांडियाप्रेमींमधील उत्साह हा शिगेला पोहोचलेला असतो. त्यामुळे भरपावसातही रास दांडियाचा खेळ रंगणार याबद्दल कोणाच्या मनात दुमत असण्याचे कारण नाही. मागील वर्षीही शेवटी एक-दोन दिवस पावसाने हजेरी लावली होती. मात्र एक मिनिटसुद्धा गरबा थांबला नाही. सरी अंगावर झेलत आबालवृद्ध यंदाही आपल्याला थिरकताना दिसतील, अशी प्रतिक्रिया जय महाकाली देवालय ट्रस्ट, कामोठेचे अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी दिली.
..................
चौकट
वॉटरप्रूफ छताखाली रास दांडिया!
गणेशोत्सवाच्या अनुभवापासून धडा घेत कामोठे आणि रोडपाली येथील भाजप पुरस्कृत दोन नवरात्रोत्सव मंडळांनी थेट वॉटरप्रूफ मंडप टाकला आहे. हॅप्पी सिंग आणि अमर पाटील यांच्या मंडळाचा रास दांडिया वॉटरप्रूफ छताखाली आहे. त्यामुळे कितीही पाऊस आला तरी गरबा खेळण्यासाठी व्यत्यय येणार नाही. यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागले आहेत.
......................
कोट
पाऊस असो वा नसो नवरात्रोत्सवाचा जल्लोष अबाधित राहणार आहे. दांडियाप्रेमींच्या उत्साहावर पावसाने विरजण पडू नये म्हणून आम्ही वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेत भरपावसातही गरब्याचा आनंद घ्यावा, हीच आमची अपेक्षा आहे.
- अमर ठाकूर, नगरसेवक प्रभाग क्रमांक ७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.