बनावट नोटांचा भांडाफोड
गोरेगावातून तिघांना अटक, रॅकेट असल्याचा संशय
रवींद्र पेरवे : सकाळ वृत्तसेवा
श्रीवर्धन, ता. २३ : माणगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरात भारतीय चलनात बनावट नोटा उतरवणाऱ्या टोळीचा गोरेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत रायगड पोलिसांनी तिघांना अटक केली असून, मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात यश आले.
माणगाव टेमपाले येथील मुफस्सिर ऊर्फ मिनी अब्दुल राशिद खानदेशीच्या घरात बनावट नोटा आढळून आल्या. त्याला मदत करणारा म्हसळा तालुक्यातील निगडी-पाबरे येथील सुनील मोरेला शनिवारी अटक करण्यात आली आहे. गुरुवार (ता. २५) पर्यंत त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, तर फरारी मेहबुब उलडेला सोमवारी रात्री दिघी येथून ताब्यात घेण्यात आले. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. गोरेगाव परिसरात बनावट नोटा चलनात आणल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या कारवाईत आरोपीच्या घरातील कपाटात बनावट नोटा सापडल्या आहेत. या नोटा कशा आल्या याचा तपास पोलिस घेत आहेत. या टोळीने पंचवीस, पन्नास आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाजारात वापरल्याचे तपासात उघड झाले आहे. हुबेहुब खऱ्या नोटांसारख्या दिसणाऱ्या या नोटांमुळे सामान्य नागरिकांची दिशाभूल झाली, पण काही सजग नागरिकांमुळे हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला.
-----
तपास यंत्रणेवर राजकीय दबाव
मुख्य आरोपी मुफस्सिर ऊर्फ मिनी अब्दुल राशिद खानदेशीकडे बनावट नोटा सापडल्या. त्याने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने विविध गावांमध्ये बनावट नोटा पुरवण्याचा प्रयत्न केला होता. रविवारी (ता. २१) उशिरा याबाबत गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, मात्र नोटा वटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अन्य दोन साथीदारांना अद्याप अटक झालेली नाही. या कारवाईत अटक आरोपींमध्ये मुफस्सिर ऊर्फ मिनी अब्दुल राशिद खानदेशी (रा. टेमपाले, ता. माणगाव), सुनील बाळाराम मोरे (रा. निगडी, म्हसळा), मेहबूब उलडे (रा. बोर्लीपंचतन, ता. श्रीवर्धन) येथील असल्याने रायगड पोलिसांवर राजकीय दबाव आल्याचे बोलले जात आहे.
----
बाजारात बनावट चलनी नोटा
या परिसरात बनावट नोटा असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती, मात्र या नोटा कोणाच्या माध्यमातून चलनात आणल्या जात आहेत, याचा शोध लागत नव्हता. अखेर गोरेगाव पोलिसांच्या छाप्यात आरोपींकडून तीन लाख ८० हजारांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत, तर बाजारात असलेल्या नोटांचा तपास पोलिस घेत आहेत. गोरेगाव पोलिस ठाणे, गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी प्रकरणाचा व्यापक शोध करत आहे. तसेच नागरिकांनी संशयास्पद नोटा आढळल्यास पोलिसांच्या निदर्शनास आणावे, असे आवाहन केले आहे.
----
उघडकीस आलेल्या घटना
- पनवेलमधील छपाई कारखाना : पनवेल तालुक्यातील तळोजा एमआयडीसी परिसरातील पालेखुर्द गावात पोलिसांनी छापा टाकून नकली नोटांचा कारखाना उघडकीस आणला होता. या छाप्यात दोन लाखांपेक्षा जास्त किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. आरोपीने यूट्युब व्हिडिओ पाहून या नोटा छापण्याचे तंत्र शिकले होते.
अलिबागमध्ये टोळीला अटक : अलिबागमध्ये बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी ४९,९०० रुपये किमतीच्या नकली नोटा आणि प्रिंटर, लॅपटॉप, शाई व कागद असे साहित्य जप्त करून तीन आरोपींना अटक केली होती. ही कारवाई एका कांदा व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून करण्यात आली होती.
मुरूडमधील आंतरराज्यीय टोळी : रायगड जिल्ह्यातील मुरूडमध्ये पोलिसांनी एका आंतरराज्यीय बनावट नोटा वितरित करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. ही टोळी झारखंड, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि गोवा या राज्यांमध्ये सक्रिय होती.
----
पोलिसांच्या छाप्यात मुख्य आरोपीच्या घराच्या कपाटात काही नोटा आढळून आल्या. बॅंकेतील तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपासणी केल्यावर नोटा नकली असल्याचे आढळून आले. या प्रकरणातील तीनही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
- विजय सुर्वे, पोलिस निरीक्षक, गोरेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.