विद्यापीठांनी ज्ञान आणि संशोधनावर अधिक भर द्यावा
‘एसएनडीटी’च्या ७५व्या दीक्षांत सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ ः ‘लोकांचे दैनंदिन जगणे सुसह्य करणारे शिक्षण देणे काळाची गरज आहे. त्यासाठी विद्यापीठांनी ज्ञान आणि नवीन संशोधनावर अधिक भर द्यावा,’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी (ता. २३) केले. तसेच प्रगती आणि विकास करायचा असेल तर ज्ञान आणि संशोधन महत्त्वाचे आहेत. पदवी घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थिनींनी ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला अर्थार्जन करीत समाज आणि देश उभारणीसाठी योगदानही द्यावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) ७५व्या दीक्षांत समारंभास उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, लोकसभा माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव यांच्यासह विद्यापीठाचे सिनेट सदस्य, विविध शाखेचे अधिष्ठाता प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी सुमित्रा महाजन यांना त्यांच्या सार्वजनिक जीवनातील व महिलांच्या सक्षमीकरणातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ (डी.लिट्.) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. एसएनडीटी विद्यापीठांनी महिलांसाठी शिक्षणाचे विविध मार्ग खुले करून दिल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. या दीक्षांत समारंभात पदवी, पदव्युत्तर, पदविका विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करून संशोधन व नवोन्मेष क्षेत्रात योगदान दिलेल्या पी.एचडी. पदवीधारकांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वर्षी एसएनडीटी महिला विद्यापीठाला नॅककडून ‘ए’ श्रेणी प्राप्त झाली असून अध्यापन, संशोधन, सुशासन व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विद्यापीठाच्या वतीने अनेक शैक्षणिक उपक्रम हाती घेण्यात आल्याने विद्यापीठाने विकासाचा एक टप्पा गाठला, यामुळे विद्यार्थिनींची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली, अशी माहिती विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव यांनी दिली.
दीक्षांत सोहळ्यात २२ संशोधकांना डॉक्टरेट
- एकूण १८,३६६ विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रदान
- १९२ अभ्यासक्रमांमधील पदवी व पदविका
- २२ संशोधकांना (पी.एचडी.) डॉक्टरेट
- ७२ सुवर्णपदके, एक रौप्यपदक, एक चषक आणि १३७ विविध पारितोषिके
भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी नवीन संशोधन केले पाहिजे. ज्या क्षेत्रांत आपण आयातीवर अवलंबून आहोत, त्या क्षेत्रातच नवीन संशोधन करून त्या क्षेत्रात निर्यात वाढवली पाहिजे.
- नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी अनेक संकटांवर मात करून जनतेच्या न्याय-हक्कांसाठी कार्य केले, त्यांचा आदर्श समोर ठेवून कार्य केले आहे. या कार्याचाच सन्मान म्हणून मला ही पदवी प्रदान केली जात आहे, याचा मला अभिमान आहे.
- सुमित्रा महाजन, माजी लोकसभा अध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.