क्रिप्टो गुंतवणुकीच्या प्रलोभनाने ६३ लाखांची फसवणूक
ऑनलाइन गुन्हेगारांची नवी खेळी
उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) : शहरात पुन्हा एकदा ऑनलाइन गुन्हेगारांनी क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली नागरिकांना फसवण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अधिक नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत दोन नागरिकांची तब्बल ६३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. प्रकाश खानचंदानी आणि रेनु रायखागर या दोघांनी गुंतवणुकीच्या लालसेने भरभरून पैसे टाकले; मात्र लाभ तर दूरच, त्यांच्या पैशांचा मागमूसही लागला नाही. दोन्ही प्रकरणांत उल्हासनगर व हिललाइन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून, पोलिस आता आरोपींचा शोध घेत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नंबर १ मधील रीजेंसी एंटीलिया येथे राहणारे प्रकाश ज्ञानचंद खानचंदानी यांना १५ मे रोजी दुपारी कस्टमर केअरच्या नावाने मोबाईलवर कॉल आला. कॉल करणाऱ्यांनी क्रिप्टोमध्ये जास्त नफा मिळवून देऊ असे सांगत त्यांच्याकडून विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. प्रकाश यांनी विश्वास ठेवून वेगवेगळ्या खात्यांत ४१ लाख २१ हजार ६८० रुपये जमा केले; मात्र अपेक्षित नफा न मिळाल्याने त्यांना फसवणुकीचा संशय आला. त्यांनी उल्हासनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, दुसऱ्या घटनेत रेणु जगदीश रायखागर यांना ८ ते १३ ऑगस्टदरम्यान अवंती स्नेहा, ट्रेनर अमेय आणि रेशिपनिष्ठा मायाकुमारी या तिघींनी फोन करून डिजिटल पीआर लिमिटेड कंपनीतर्फे बोलत असल्याचे सांगितले. त्यांनी रेणु यांना बँक खात्यात एक टास्क खेळून जिंकण्याचे प्रलोभन दाखवले. त्यासाठी सुरुवातीला १९ हजार ८९८ रुपये भरायला लावले. त्यानंतरही क्रिप्टो गुंतवणुकीतून मोठा नफा मिळेल असे सांगत तिला वेगवेगळ्या बँक खात्यांत २१ लाख १९ हजार ९९९ रुपये भरायला लावले. शेवटी कोणताही नफा न मिळाल्याने रेणु यांनाही फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांच्या तक्रारीवरून हिललाइन पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.