डोंबिवलीतून १० हजार जवानांना फराळ पोहोचणार
डोंबिवली, ता. २४ (बातमीदार) : भारत विकास परिषद हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सचान डोंबिवली शाखेने यंदा दिवाळीत १० हजार फराळाचे डबे व विद्यार्थ्यांनी बनविलेली शुभेच्छा कार्ड सीमेवरील सैनिकांना पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. भारतीय सैनिकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कायमच आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण केले. त्यांच्यामुळे प्रत्येक नागरिक सुरक्षित आहेत, पण ते आपले सण साजरे करू शकत आहेत. त्यामुळे सणाच्या वेळी सैनिकांचे स्मरण करणे, हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. याच गोष्टीची जाणीव ठेवत आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या घवघवीत यशासाठी सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविला जात आहे.
यंदा परिषदेकडून फराळाचे डबे पाठवण्याचे तिसरे वर्ष आहे. मागील वर्षी नऊ सीमांवरील पाच हजार सैनिकांपर्यंत फराळ पोहोचवला होता. १० हजार फराळाचे डबे सीमेवर पाठवण्यासाठी सुमारे ५० लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. लोकसहभागातून ही रक्कम उभी राहात आहे. या सेवा आणि कृतज्ञतेच्या यज्ञात कमीत कमी ५०० रुपये देऊन फराळाचा एक बॉक्स किंवा अधिक देणगी देऊन सहभाग घेऊ शकता. तरी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्वांनी देणगीची समिधा अर्पण करावी, असे आवाहन डोंबिवली शाखा अध्यक्षा ॲड. वृंदा कुलकर्णी यांनी केले आहे.
फराळाचे पॅकिंग सुरू
फराळाचे सर्व पॅकिंग परिषदेचे सदस्य, डोंबिवली शहरातील राष्ट्राभिमानी नागरिक, विद्यार्थी यांच्या श्रमदानातून होणार आहे. त्याची सुरुवात शारदीय नवरात्र घटस्थापनेला सोमवारी (ता. २२) सकाळी डोंबिवली पश्चिम येथे पूर्व भागात सैनिक ‘पद्मश्री’ गजानन माने आणि इतर मान्यवरांच्या हस्ते फराळाचे डबे भरण्यात आले.
प्रकल्पाला मदत करण्याचे आवाहन
परिषदेच्या कार्याची दखल घेत माजी प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी, ‘एसआयआरएफ’ संस्थेच्या संचालिका सुमेधा चिथडे, निवेदिका सूत्रसंचालिका अनघा मोडक यांनीदेखील व्हिडिओ तयार करून प्रकल्पाला मदत करावी, असे आवाहन केले आहे.