मालमत्ता कर भरण्यास चालढकलपणा
पालिकेकडून दंडात्मक कारवाईचा इशारा; नळजोडणी खंडित होणार
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २४ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य आधार असणाऱ्या मालमत्ता कर भरण्यात नागरिकांचा चालढकलपणा सुरूच असून, यंदाही अनेक करदात्यांनी देय रक्कम भरण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईसह नळजोडणी खंडित करण्याचा इशारा दिला आहे. २०२५-२६ आर्थिक वर्षासाठीचे कर बिल करदात्यांना देण्यात आले असून, ऑगस्ट अखेरपर्यंत कर भरणाऱ्यांना पाच टक्के सवलत दिली होती. शिवाय क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन भरणा, तसेच विविध ठिकाणी कर भरणा केंद्रांची सुविधादेखील देण्यात आली, मात्र अनेकांनी अजूनही कर न भरल्याने पालिकेने आता कडक भूमिका घेतली आहे.
पालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून जप्ती वॉरंटच्या पूर्वसूचना पाठवण्याचे काम सुरू असून, विहित मुदतीत कर न भरल्यास मालमत्ता जप्ती, अटकावणी आणि त्याहूनही गंभीर कारवाई म्हणजे नळजोडणी खंडित केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात असून, थकीत करावर दरमहा दोन टक्के दंड आकारण्यात येणार आहे. काही मालमत्ताधारक वर्षानुवर्षे कर भरणे टाळत आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावरही कठोर कारवाईची तयारी आहे. मालमत्ता कर विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, विहित मुदतीत तातडीने कर भरा, अन्यथा पाणीपुरवठा खंडित होण्यासह इतर दंडात्मक कारवाया टाळता येणार नाहीत.
सहकार्याचे आवाहन
ऑगस्टअखेरपर्यंत कर भरल्यास पाच टक्के सवलत
कर न भरल्यास मालमत्ता जप्ती, नळजोडणी खंडित होणार.
दरमहा थकीत करावर दोन टक्के दंड आकारणार
ऑनलाइन व केंद्रांद्वारे भरणा सुविधा उपलब्ध आहे.
महापालिकेकडून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन