स्वच्छतेसाठी ‘सुपर हीरो’ मैदानात
पालिका उपक्रमात ३५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
वाशी, ता. २४ (बातमीदार)ः ‘सुपर स्वच्छ नवी मुंबई’चा स्वच्छ संवाद उपक्रम स्वच्छता ही सेवा २०२५ अभियानांतर्गत पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या उपक्रमात नवी मुंबई महापालिका तसेच खासगी अशा ७० हून अधिक शाळांमधील ३५ हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
ओल्या कचऱ्याचा शुभंकर ओलू, सुक्या कचऱ्याचा सुकू, घरगुती घातक कचऱ्याचा घातकू आणि सॅनेटरी कचऱ्याचा सानू या चार अॅनिमेटेड मॅस्कॉटद्वारे स्वच्छतेची व कचरा वर्गीकरणाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्याचप्रमाणे अन्नाचा कचरा, पुनर्वापरयोग्य कचरा, नाकारलेला कचरा आणि इलेक्ट्रिक कचरा याचीही माहिती मुलांना दिली गेली. या वेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, कचरा वर्गीकरण, त्याची विल्हेवाट तसेच सोशल मीडिया, एआयचा योग्य वापर याविषयी सविस्तर माहिती घेतली. या उपक्रमामध्ये २०० हून अधिक विद्यार्थी, २५ हून अधिक शिक्षक सहभागी होते. तसेच ३५ हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी होते.
----------------------------------------------
पालिका उपक्रमांची माहिती
विद्यार्थ्यांशी ऑनलाइन थेट संवाद साधत आयुक्तांनी मुलांच्या शंकांचे निरसन केले. तसेच स्वच्छतेविषयी प्रश्न विचारून त्यांना संवादात सक्रिय सहभागी करून घेतले. प्लॅस्टिक कचऱ्याची दुष्परिणामांची माहिती विद्यार्थ्यांना देताना मुंबई संस्थेच्या सहयोगाने नवी मुंबई महापालिका दोन महिन्यांपासून राबवत असलेल्या प्लास्टिक कचरा आणि ई-कचरा उपक्रमांची माहिती दिली.
-----------------------------
प्लॅस्टिक वस्तूंचे प्रदर्शन
मुंबई संस्थेच्या प्रतिनिधींनी स्वच्छता संवाद कार्यक्रमात एकल वापर प्लॅस्टिकला प्रतिबंध, प्लॅस्टिकचा पुनर्वापर, प्लॅस्टिक कचऱ्यावर पुनप्रक्रिया करून वस्तू निर्मिती अशा विविध बाबींचे सादरीकरण करण्यात आले. प्लॅस्टिकच्या कचऱ्याच्या तयार केलेल्या पुनर्प्रक्रियाकृत वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याने नवी मुंबईचे सुपर स्वच्छता हीरो व्हावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.