स्वप्ननगरीत जगण्याची धडपड
द्रोणागिरीत नागरी समस्यांमुळे रहिवासी त्रस्त, सिडकोचे दुर्लक्ष
उरण, ता. २४ (वार्ताहर)ः सिडकोच्या द्रोणागिरी वसाहतीमध्ये अनेकांनी त्यांच्या स्वप्नातील घरखरेदी केली. दरम्यान, शहराची निर्मिती करणाऱ्या सिडकोने रहिवाशांना नागरी सुविधांपासून वंचित ठेवल्याने गैरसोयींशी झगडावे लागत आहे.
उरण तालुक्यात सिडकोच्या माध्यमातून महालण विभागाचे कवडीमोल भावाने भूसंपादन केले. त्याबदल्यात नागरिकांना साडेबारा टक्के भूखंड द्रोणागिरीच्या सेक्टर ४७ ते ५६ दरम्यान देण्यात आले. या वसाहतींमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी मोठमोठ्या इमारतींची निर्मिती केली. या इमारतींमध्ये मुंबई, नवी मुंबई, उरण परिसरातील नागरिकांनी लाखो रुपये खर्च करून घरे विकत घेतली. उरण रेल्वे, अटल सेतूसारख्या दळणवळणाच्या साधनांमुळे या वसाहतींमध्ये रहिवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. दरम्यान, सिडको प्रशासनाने निर्मिती केलेल्या नोडमध्ये रस्ते, पाणी, सांडपाणी निचरा होण्यासाठीची गटारे, शाळा, खेळाची मैदाने नसल्याने विविध अडचणींचा सामना करण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे.
--------------------------------------------
कोंडीचा मनस्ताप
सिडकोच्या नियोजनशून्य कारभारामुळे या परिसरात सीआरझेड लागल्याने अनेक इमारतांना बांधकाम परवाना मिळालेला नाही तसेच अनेक घरांना परवाना दिला गेलेला नाही. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिसरातील मुख्य रस्त्यांवर भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
------------------------------
आश्वासनांवर बोळवण
द्रोणागिरी परिसरातील विविध नागरी कामांचे प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आले आहेत. लवकरच त्याची मंजुरी मिळून येथील राहिलेली कामे मार्गी लागतील. गटारांची कामे केली जातील, असे आश्वासन सिडकोचे कार्यकारी अभियंता राजेंद्र रेडे यांनी दिले आहे.
--------------------------------
रस्ते ः द्रोणागिरी वसाहत निर्माण झाल्यानंतर अनेक इमारतींपर्यंत रस्ते तयार झालेले नाहीत. सेक्टर ५२, ५३, ५४मध्येही हीच अवस्था आहे. तयार असलेले रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. त्यामुळे रहिवाशांचा दैनंदिन प्रवास खड्ड्यांमधून सुरू आहे.
पाणी ः वसाहतीत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी सिडकोची असताना वर्षानंतर बहुतांशी सेक्टरमध्ये पाण्याची समस्या आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने काही इमारतींना टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो.
गटारे ः काही ठिकाणी गटारांची निर्मिती करण्यात आली आहे. तर काही भागांत सांडपाणी वाहतुकीची व्यवस्थाच नसल्याने गटारांचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मैदाने ः लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान नसल्याने गैरसोय होते. तसेच वसाहतीमध्ये विरंगुळ्यासाठी उद्यान बांधण्यात आलेले नाही.
पथदिवे ः वसाहतींमध्ये काही ठिकाणी पथदिवे नसल्याने अंधारातून मार्ग काढावा लागतो.
-------------------------
द्रोणागिरी परिसरात अनेकांनी घरे घेतली आहेत. रहिवाशांना ज्या सुविधा मिळाला पाहिजेत त्या दिल्या जात नाहीत. रस्त्यांची दुरवस्था आहे. सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याकडे सिडकोने लक्ष केंद्रित केले पाहिजे.
- रोहन पाटील, द्रोणागिरी वसाहत, रहिवासी
-----------------------------
नोडनुसार विभागणी - ४६ ते ५६
रहिवासी संख्या - पाच हजार