दोनशे मीटरमध्ये दहा गतिरोधक
अंबरनाथ, ता. २४ (वार्ताहर) ः शहरातील कर्जत-काटई राज्यमार्गाच्या रस्त्यावर दोनशे मीटरच्या अंतरात तब्बल दहा गतिरोधक उभारले आहेत. वाहतुकीच्या नियमानुसार आवश्यक असलेले पांढरे पट्टे, थर्मी पेंट किंवा सूचनाफलक येथे कुठेही नसल्याने वाहनचालकांसाठी हे गतिरोधक अपघाताचे सापळे ठरत आहेत.
रॉयल पार्क ते सीएनजी पेट्रोलपंप या वर्दळीच्या रस्त्यावर अवघ्या दोनशे मीटरमध्ये दहा गतिरोधक आल्याने अनेक वाहनांचे नुकसान होत आहे. अपघाताच्या घटनाही वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, या मार्गालगत म्हाडा कॉलनी, काही वसाहती आणि शाळा असूनही नियमबाह्य पद्धतीने गतिरोधक उभारल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाहतूक नियमांनुसार गतिरोधक उभारल्यावर त्यावर पांढरे पट्टे, थर्मी पेंट आणि किमान ४० मीटर आधी सूचनाफलक असणे गरजेचे आहे. तसेच रम्बलिंग पद्धतीचे गतिरोधक असावेत, उंची व लांबीही ठरावीक मर्यादेत असावी, असा नियम आहे; मात्र या रस्त्यावरच्या गतिरोधकांमध्ये कुठलाही नियम पाळलेला नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
अपघात टाळण्यासाठी गतिरोधक हवेत याबाबत दुमत नाही; पण नियमबाह्य, अनावश्यक गतिरोधक लगेच काढून टाकावेत. आवश्यक त्या ठिकाणीच पांढरे पट्टे व सूचनाफलकांसह नियमांनुसार गतिरोधक उभारावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
गतिरोधकांवर पांढरे पट्टे आणि सूचनाफलक लावण्याचे काम लवकरच केले जाईल. तसेच गतिरोधकांची संख्या कमी करण्याबाबत नगरपालिका प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
- विजय पुराणिक, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग