शेतकऱ्यांसाठी ठोस योजना हवी
राज्य शासनाकडे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांची मागणी
वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘लाडके शेतकरी योजना’ राबविण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी राज्य शासनाकडे एक्स या समाजमाध्यमाद्वारे केली आहे. ठाण्यातील माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी म्हटले आहे, की शासनाने सध्या राज्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पांवर होणारा खर्च तात्पुरता स्थगित करावा. या बचतीतून पुढील किमान पाच वर्षांसाठी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि खते मोफत पुरवावीत. यासोबतच शेतकऱ्यांच्या संपूर्ण कुटुंबाला मोफत आरोग्य उपचार आणि त्यांच्या मुलांना घेत असलेले सर्व शिक्षण मोफत देण्यात यावे, असेही त्यांनी सुचवले आहे.
या योजनेसाठी निधी कोठून उभा करायचा, यावरही त्यांनी एक ठोस पर्याय दिला आहे. शासकीय अधिकाऱ्यांचे आणि मंत्र्यांचे परदेश दौरे तसेच विविध योजनांच्या जाहिरातींवर होणारा अवाढव्य खर्च याला लगाम घातल्यास ‘लाडके शेतकरी योजना’ सहजपणे राबवणे शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शहरी विकासाइतकेच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचे ग्रामीण आणि कृषी क्षेत्राचा विकास आहे. शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्याला सक्षम करणे ही शासनाची प्राथमिकता असली पाहिजे. ही योजना लागू झाल्यास राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल आणि ते कर्जमुक्त होऊन सन्मानाने जगू शकतील, असेही ते म्हणाले. आता शासन या मागणीवर काय विचार करते आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ही ‘लाडके शेतकरी योजना’ प्रत्यक्षात येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.