धर्मवीर आनंद दिघे मंडळाचे मुख्य कार्यालय सुरू
रिक्षा, टॅक्सीचालकांसाठी योजना राबाविण्याचे कामकाज चालणार
ठाणे शहर, ता. २४ (बातमीदार) : महाराष्ट्रातील रिक्षा व टॅक्सीचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांच्या कल्याणाकारिता ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळाचे मुख्य कार्यालय सुरू करण्यात आले आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे ते सुरू करण्यात आले असून, राज्यातील लाखो रिक्षा, टॅक्सीचालकांच्या जीवनात स्थैर्य आणि सुरक्षिततेचा मार्ग मोकळा झाला आहे. रिक्षा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे स्वतः ठाण्यातील असून, या कार्यालयाच्या कामाला गती येईल, असा विश्वास रिक्षा, टॅक्सीचालकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत रिक्षा, टॅक्सीचालकांच्या कल्याणसाठी सुरू करण्यात आलेल्या मंडळाचे राज्यातील मुख्य कार्यालय ठाण्यात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यालयामधून रिक्षा व टॅक्सीचालकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबाविण्याचे कामकाज चालणार आहे. येथून सर्व रिक्षा, टॅक्सीचालकांना घरबसल्या ऑनलाइन सभासद नोंदणी करता येणार आहे. https://ananddighekalyankarimandal.org या अधिकृत संकेतस्थळावर वाहन व परवाना क्रमांक, कुटुंबाची माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यात यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे कार्य सुरू असून, या चालकांना अधिकृत वेबसाईटवर बनावट लिंकपासून दूर राहण्याची सूचना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी केली आहे.
कोट
धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने स्थापन झालेले हे मंडळ म्हणजे चालकांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक हितासाठी उभारलेले माध्यम ठरणार असून, यामध्ये सहभागी होणे ही सर्व चालकांसाठी सुवर्णसंधी असल्याने त्यांनी त्यात सामील व्हावे.
- हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे