उपजिल्हा रुग्णालयात जागेची कमतरता
अडीच एकर जागा असून योजना रखडली, दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ
कासा, ता. २४ (बातमीदार) ः कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात सध्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याने जागेची कमतरता तीव्र जाणवत आहे. हे रुग्णालय नाशिक-डहाणू राज्य मार्गावर रस्त्यालगत असल्यामुळे येथे महामार्गावरील अपघातग्रस्त रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. याशिवाय आसपासच्या सात प्राथमिक आरोग्य केंद्रांतून पुढील उपचारासाठी रुग्णांना या रुग्णालयात पाठवले जाते.
१९६३मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून सुरू झालेले हे रुग्णालय १९७८मध्ये ग्रामीण रुग्णालयात रूपांतरित झाले. पुढे महामार्गावरील अपघात आणि आदिवासी भागातील रुग्णसंख्येची वाढ लक्षात घेऊन याला ५० खाटांचे रुग्णालय करण्यात आले. दरम्यान, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने १०० खाटांच्या श्रेणीवर्धनाची मागणी होत आहे. कासा परिसर दुर्गम भाग असल्याने विंचू व सर्पदंशाचे रुग्ण, प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला तसेच आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थी नेहमीच या रुग्णालयाचा आधार घेतात. परिणामी रुग्णालयातील ५० खाटांची क्षमता अपुरी पडत असून, रुग्णांवर दाटीवाटीत उपचार करावे लागत आहेत. या विस्तारासाठी अडीच एकर जागेची गरज असून, जागा उपलब्ध न झाल्याने योजना रखडली आहे. खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी भेटीदरम्यान जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. काही वर्षांपूर्वी मोठ्या खर्चाने आधुनिक ऑपरेशन थिएटर, पुरुष-स्त्री वॉर्ड, स्वतंत्र प्रसूतिगृह व ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली. मात्र योग्य नियोजनाअभावी या सुविधा अद्याप पूर्ण क्षमतेने वापरात आणल्या गेल्या नाहीत. ऑपरेशन थिएटर धूळ खात पडलेले असून, कोंदट जागेत रुग्णांना उपचार घ्यावे लागत आहेत.
चौकट
१० पदे रिक्त
या रुग्णालयात मंजूर ४८ पदांपैकी ३८ पदे भरलेली आहेत, तर १० पदे रिक्त आहेत. सध्या आठ डॉक्टर, आठ नर्स, दोन परिचारिका, सहा सफाई कामगार आणि तीन कंत्राटी सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. एसी यंत्रणा असूनही टेक्निशियन नसल्याने ती बंद आहे. एक्स-रे, रक्त गट तपासणी, दंतरोग चिकित्सा व नेत्रतपासणी सेवा मात्र सुरू आहेत.
कोट
कासा उपजिल्हा रुग्णालयात कर्मचारी संख्या पुरेशी आहे, पण जागेच्या अभावामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडीही मोठा प्रश्न आहे. तरीही ग्रामपंचायततर्फे स्वच्छता व इतर बाबतीत सहकार्य केले जाते.
- हरेश मुकणे, उपसरपंच कासा
महामार्गावरील अपघात रुग्णांची वाढती संख्या आणि दुर्गम भागातील रुग्णांची गरज लक्षात घेता १०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय अत्यावश्यक आहे. जागा उपलब्ध झाल्यास रुग्णसेवा अधिक सुकर होईल. सध्या तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी संख्या पुरेशी आहे.
- डॉ. सचिन वाघमारे, वैद्यकीय अधीक्षक, कासा उपजिल्हा रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.