शाळा-महाविद्यालयांबाहेर वाहतूक कोंडी
विद्यार्थी-पालक त्रस्तः सुरक्षिततेसाठी वाहतूक नियोजनाची गरज
वाशी, ता. २४ (बातमीदार) ः नवी मुंबई शहरामध्ये शाळा व महाविद्यालयांच्या बाहेर वाढत्या वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शाळा व महाविद्यालय भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस हा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करतो. गर्दीतून मार्ग काढताना अनेकदा छोटे अपघात होतात.
शाळांबाहेर पार्किंगची सोय नसल्याने मुलांना आणण्यासाठी पालक वाहने रस्त्यावरच उभी करतात. त्यामुळे वाहतूक विस्कळित होते. महाविद्यालयाबाहेरही विद्यार्थ्यांची वाहने अनियमितरीत्या पार्क केली जातात. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. ऐरोलीमधील श्रीराम विद्यालय, सेंट झेव्हिअर्स, सरस्वती विद्यालय, मेहता कॉलेज, दत्ता मेघे इंजिनिअरिंग, घणसोलीतील न्यू बॉम्बे स्कूल, ग्लोबल टिळक स्कूल, कोपरखैरणेतील लोकमान्य टिळक स्कूल यांसारख्या संस्थांबाहेरही रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
लग्नाच्या हॉलने समस्येत भर
शहरातील लग्नाचे हॉलही या समस्येत भर घालत आहेत. स्वतःची पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहने थेट रस्त्यावर उभी केली जातात. परिणामी तासन्तास वाहतूक ठप्प होते.
ठोस उपाययोजनेची मागणी
या समस्येकडे वाहतूक पोलिसांनी ठोस आराखडा तयार करून लक्ष देण्याची गरज आहे, परंतु नागरिकांच्या वारंवार मागणीनंतरही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. यासंदर्भात वाहतूक पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी व नागरिकांच्या सोयीसाठी लवकरात लवकर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.