बोईसर, ता. २५ (बातमीदार) ः तारापूर औद्योगिक वसाहतीमधील मेडले या कंपनीत काही दिवसांपूर्वी विषारी वायूची बाधा झाल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला. अशा घटना अनेकदा या भागात होत असतात; मात्र त्या रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून कारखान्यांमध्ये सुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याने वारंवार दुर्घटना होत आहेत.
बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहत देशातील प्रदूषणकारी एमआयडीसींच्या यादीत आघाडीवर असून गेल्या काही वर्षांत सलग आग, स्फोट, वायुगळतीच्या घटना घडत आहेत. गेल्या सात वर्षांत ५९ मृत्यू, ११३ कामगार जखमी झाल्याची घटना घडल्या असून हजारो नागरिकांना आरोग्याचा त्रास जाणवत आहे. तारापूर औद्योगिक वसाहत कामगारांसाठी सुरक्षित नसल्याचेही दिसून आले. १९९० पासून या परिसरात अनेक कारखान्यांमध्ये स्फोट, आग लागली असून त्यात कामगारांचे बळी गेले आहेत. अपघात घडल्यानंतर काही दिवस या विषयावर चर्चा होते आणि पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होते. तारापूर येथील उद्योगांमधील सुरक्षा प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासोबत येथील उद्योजक व व्यवस्थापनाच्या मानसिकतेमध्ये बदल घडवून आणणे आवश्यक झाले आहे.
औद्योगिक क्षेत्र वाढल्यामुळे येथील कामगारांची संख्या वाढतेच आहे. उद्योजकांनी उत्पादननिर्मिती क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने नवनवीन तंत्रज्ञान आणले आहे; मात्र कामगारांच्या सुरक्षेसाठी आधुनिक उपाययोजना केलेली नाही. रासायनिक पदार्थ हाताळण्यासाठी कामगार प्रशिक्षित असण्याची गरज आहे; मात्र काही मोजक्या कंपन्यांनीच कामगारांना प्रशिक्षण दिले आहे. अन्य कंपन्या कमी खर्चात जास्त उत्पादन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. काही कारखान्यांमध्ये अग्निशमन दलाने दिलेल्या सुरक्षा सूचनांना डावलून काम केले जात आहे. अग्निशमन दलाच्या निर्देशांना धाब्यावर बसवून उत्पादन वाढवण्यासाठी कामगारांच्या जीव धोक्यात घातला जात आहे. त्यामुळे संबंधित कारखान्यांबाबत कारवाई होणे गरजेचे आहे.
धोकादायक रसायनांचा वापर असल्यामुळे आग, स्फोट व वायुगळती होऊन प्राणहानी होण्याची शक्यता लक्षात घेता औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांमार्फत काटेकोरपणे तपासणी केली जाते. सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत आजपर्यंत २४४ फौजदारी खटले न्यायालयात दाखल आहेत. ज्या कारखान्यांना सुरक्षा लेखा परीक्षेच्या तरतुदी लागू होतात, अशांचे शासनमान्यता प्राप्त सुरक्षा लेखापरीक्षण करून घेण्यात येते. कामगारांच्या सुरक्षेबाबत दोन वर्षांमध्ये १६ प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. मृत कामगारांच्या वारसांना ७० लाखांची भरपाई देण्यात आली आहे.
- माधव तोटेवाड, सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, पालघर
कामगार आयुक्त कार्यालयाकडून आस्थापनांची पाहणी करीत दोषी आढळणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येते. सर्व कारखान्यांना व आस्थापना प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर करावा, जेणेकरून अपघात टाळता येतील, यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. अपघातग्रस्त कामगारांना न्याय मिळवून दिला जातो.
- विजय चौधरी, कामगार उपायुक्त
औद्योगिक वसाहतीत गेल्या काही वर्षांत झालेले विविध अपघात हे संबंधित कारखान्यांत यांत्रिक, तसेच रासायनिक प्रक्रियेदरम्यान उद्भवलेल्या अडचणींमुळे झाले आहेत. त्याबाबत सरकारी विभागामार्फत संबंधित कारखान्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येते.
- अविनाश ग. संखे, उपअभियंता, तारापूर औद्योगिक विकास महामंडळ
पाच वर्षांतील अपघात
वर्ष दुर्घटना
२०२१ १४
२०२२ १५
२०२३ २८
२०२४ २३
२०२५ (आजपर्यंत) ०९
दुर्घटनांची आकडेवारी
अपघातांचा प्रकार मृत्यू
प्राणघातक घटना ३३
स्फोट ११
वायुगळती १०
आग ५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.