जलबोगद्याच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करा
सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांची मागणी
पेण, ता. २५ (वार्ताहर) ः पेण तालुक्यातील हेटवणे धरणातील पाणी सिडकोमार्फत जलबोगद्याद्वारे नवी मुंबईकडे वळविण्याच्या कामावरून स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या कामाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
सिडकोने मेघा इंजिनिअर कंपनीमार्फत जिते व बेलवडे परिसरात जवळपास तीनशे फूट खोदकाम केले आहे. या कामाचा मुख्य उद्देश नवी मुंबईला जलपुरवठा करण्याचा आहे, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पेण, वाशी व खारेपाट विभाग हेटवणे धरणाच्या पाण्यासाठी संघर्ष करत असताना स्थानिकांना वंचित ठेवून हे पाणी बाहेर वळविणे हा अन्याय असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
बेकावडे यांनी आरोप केला की, या जलबोगद्याच्या कामाला काही आवश्यक परवानग्या घेतल्याचे दिसून येत नाही. मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खोदकामासाठी करण्यात येणाऱ्या स्फोटांमुळे (ब्लास्टिंग) आसपासच्या घरांना तडे गेले आहेत, तर शेतजमिनी व पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे, हेटवणे धरण हे मातीचे असल्याने सतत होणाऱ्या धक्क्यांचा परिणाम त्याच्या संरचनेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर धरणाला तडे गेले तर त्याचा गंभीर धोका हजारो नागरिकांच्या सुरक्षेवर आणि शेतीवर ओढवू शकतो. म्हणूनच या प्रकल्पाची तातडीने व सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे बेकावडे यांनी स्पष्ट केले. स्थानिक शेतकरी व नागरिकांनीदेखील या मुद्द्यावर आक्रोश व्यक्त केला आहे. धरणाचे पाणी सर्वप्रथम पेणकरांच्या शेतीसाठी व घरगुती वापरासाठी उपलब्ध व्हावे, ही त्यांची मागणी आहे. शासनाने या भागातील दीर्घकालीन पाणीटंचाई लक्षात घेऊन स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.