भगवान खैरनार : सकाळ वृत्तसेवा
मोखाडा, ता. २५ ः मोखाड्यासारख्या दुर्गम भागात बेरोजगारी, स्थलांतर, कुपोषण आणि पाणीटंचाई अशा गंभीर समस्यांनी आदिवासी समाज ग्रासलेला आहे. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि शेती क्षेत्रात बदल घडवून आणण्याचे ध्येय समोर ठेवत हे ध्येय सत्यात बदलणाऱ्या श्रद्धा शृंगारपुरे यांच्या कार्यामुळे त्यांचे महत्त्व अधोरेखित होत आहे. आदिवासींसाठी त्यांची असलेली तळमळ आजही तितक्यात जिव्हाळ्याचा विषय आहे. आदिवासी समाजाला समस्यांच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी त्या धडपड करीत आहेत.
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात स्वतःला हरवून घेण्यापेक्षा त्यांनी ग्रामीण भागातील वंचित समाजाला उच्च पातळीवर नेण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले. त्यातूनच श्रद्धा शृंगारपुरे यांनी २००८ मध्ये एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मोखाड्यात आदिवासी समाज परिवर्तनाची कास धरली. गेल्या १५ वर्षांपासून आजतागायत त्या या समाजाच्या उन्नत कामांसाठी प्रवाहित आहेत. मोखाड्यासह पालघर, नाशिक, कोकण विभागात आणि मुंबईच्या शहरी भागात त्या सामाजिक कामात सक्रिय काम करीत आहेत.
वकील राहुल तिवरेकर, श्रद्धा शृंगारपुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन २०१७ मध्ये ‘दिगंत स्वराज फाउंडेशन’ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषिवल करण्याचा ध्यास आहे. दरवर्षी दोन हजार शेतकऱ्यांसोबत एक लाख दर्जेदार फळबाग आणि फुलबाग लागवड करण्याचा प्रयत्न आजही सुरूच आहे. या प्रयत्नांमुळे शेतकरीवर्गाचा उत्पन्नाचा स्रोत वाढतच आहे.
पाणी व्यवस्थापन क्षेत्रात श्रद्धा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमूलाग्र योगदान आहे. संस्थेच्या माध्यमातून १०० कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण करून ९९ गावपाडे पाणीटंचाईमुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचसोबत गावकऱ्यांना जलवाहिनीची देखभाल याबाबतचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रात योगदान देताना ग्रामीण भागात दरवर्षी वह्या वितरण, डिजिटल कॉम्प्युटर लॅब उभारणी, महिला प्रौढ साक्षरता वर्ग आणि महिला रोजगार केंद्र सुरू करून हजारो महिला व विद्यार्थ्यांना लाभ मिळवून दिला आहे. त्यांच्या योगदानामुळे ६० हजार महिला प्रौढ साक्षरतेचे धडे गिरवत आहेत. कोरोना काळात श्रद्धा यांनी आदिवासी भागातील मुलांच्या शिक्षणासाठी ‘बोलकी शाळा’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. या उपक्रमाची नोंद सात देशांनी घेतली. त्यासाठी त्यांना मानाच्या सन्मानाने पुरस्कृतही केले गेले.
सामाजिक कार्याची दखल
श्रद्धा शृंगारपुरे यांनी तरुणांनी रोजगाराभिमुख व्हावे, याकरिता युवकांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासाच्या संकल्पना रुजविण्याचे कार्य केले आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांची सामाजिक लेखापरीक्षणासाठी प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी नियुक्त केली आहे. त्यांच्या मौलिक कार्याची दखल घेऊन त्यांना मानाचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने गौरवले आहे. ‘सकाळ’ वूमन इम्पॅक्ट अवॉर्डनेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आजवर त्यांच्या विविध्यपूर्ण योगदानामुळे त्यांना राज्य व देश पातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आदर्श सामाजिक कार्यकर्त्या म्हणून श्रद्धा शृंगारपुरे यांचे महत्त्व आजही वंचित समाजामध्ये अधोरेखित केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.