मुंबई

ठाण्यात ‘क्रिप्टोकरन्सी अन्वेषण कक्ष’

CD

ठाण्यात ‘क्रिप्टोकरन्सी अन्वेषण कक्ष’
राज्यातील पहिला उपक्रम; फसवणुकीला बसणार आळा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : सायबर गुन्ह्यांच्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे गुन्हेगार दिवसेंदिवस नवनवीन पद्धतींचा अवलंब करीत आहेत. ऑनलाइन फसवणूक, बँक खात्यांतून पैसे वळवणे, खोट्या गुंतवणुकीचे प्रलोभन दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणे यामध्ये आता क्रिप्टोकरन्सी हा नवा मार्ग गुन्हेगार वापरू लागले आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकींना वेळीच आळा घालण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्तालयाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यात प्रथमच ‘क्रिप्टोकरन्सी अन्वेषण कक्ष’ ठाण्यात स्थापन झाले आहे. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचा तपास, अपहार झालेल्या रकमेचा माग काढणे आणि तपास अधिकाऱ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शन या कक्षाच्या माध्यमातून होणार आहे.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे ब्लॉकचेनवर आधारित व्हर्च्युअल चलन. यात व्यवहार डिजिटल व विकेंद्रित प्रणालीत होतात. त्यामुळे त्यावर कोणत्याही सरकारचे थेट नियंत्रण नसते. बिटकॉईन, इथेरियम, डॉजकॉईन अशा अनेक चलनांचा वापर मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीसाठी केला जातो. याच वैशिष्ट्यांचा फायदा घेऊन गुन्हेगार ‘क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक दुप्पट’, ‘जलद नफा’ किंवा ‘परदेशातून पैसे पाठवण्यासाठी वॉलेट लिंक’ अशा प्रलोभनाचे जाळे तयार करतात. नागरिकांकडून रुपये घेऊन ते क्रिप्टोमध्ये रूपांतरित केले जातात व त्वरित परदेशी वॉलेटमध्ये हस्तांतरित होतात. एकदा रक्कम बाहेर गेली की ती परत मिळवणे अत्यंत अवघड ठरते. कारण ब्लॉकचेनवरील व्यवहार गुप्त आणि अपरिवर्तनीय असतात.

महाराष्ट्रासह देशभरात अशा शेकडो तक्रारी नोंदविल्या गेल्या आहेत. लाखो-कोटींचा गंडा घालून आरोपी परदेशात बसूनही लोकांची फसवणूक करीत आहेत. अलीकडच्या काळामध्ये ठाण्यात सायबर गुन्हेगारीसह क्रिप्टोकरन्सी फसवणुकीचे प्रकारही घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. जनजागृती करूनही नागरिक झटपट दुप्पट पैशाच्या प्रलोभनाने अशा विविध योजनांत फसत आहेत; मात्र एकदा फसवणूक झाली की गुंतवलेली रक्कम मिळवणे कठीण जाते. म्हणूनच ठाणे पोलिस आयुक्तालयाने क्रिप्टोकरन्सी अन्वेषण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाचे उद्‌घाटन बुधवारी (ता. २४) पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सह पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, आर्थिक गुन्हे शाखा व सायबर सेलचे अधिकारी उपस्थित होते.

कक्षाची वैशिष्ट्ये
नव्याने स्थापन केलेल्या कक्षामध्ये आर्थिक गुन्हे शाखा व सायबर पोलिस ठाण्यातील क्रिप्टोकरन्सी विषयातील प्रावीण्य असलेले दोन अधिकारी व सहा अंमलदार अशा आठ जणांची नेमणूक केली आहे.
तसेच सर्व सायबर तपास अधिकाऱ्यांना क्रिप्टोकरन्सी व ब्लॉकचेन तपास पद्धतींचे प्रशिक्षण देण्यासाठी आयआयटीची मदत घेण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात गुन्हे उघडकीस आणणे व आरोपींपर्यंत पोहोचणे सोपे होईल.

काळाची पावले ओळखून कक्ष स्थापन
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण पाहता क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून होणाऱ्या अपहारांची शक्यता वाढत आहे. काळाचे पाऊल ओळखून हा कक्ष सुरू केला आहे. राज्यातला हा पहिला प्रयोग असून, भविष्यात इतर शहरांमध्येही असे कक्ष उभारण्याची आवश्यकता भासेल, असे आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी या वेळी सांगितले.

फसवणुकीला आळा बसणार
सध्या तरी ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात क्रिप्टोकरन्सीसंबंधित तक्रार नोंदवली गेलेली नाही. परंतु आगामी काळात असे गुन्हे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळेआधी तयारी करून ठेवणे, नागरिकांना जनजागृती करणे व तपासासाठी तज्ज्ञ तयार ठेवणे हे या कक्षाचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे. यामुळे भविष्यात क्रिप्टोकरन्सीशी संबंधित आर्थिक गुन्ह्यांना आळा बसेल आणि नागरिकांचा विश्वास टिकून राहील, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : संकटाच्या काळात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या सरकार पाठीशी राहणार

Parli Vaijnath : ओबीसी आरक्षण संपले! पोलीस भरतीत मुले लागत नाहीत, या विवंचनेतून ओबीसी बांधवाने संपवलं जीवन

इलेक्ट्रिक SUV चाहत्यांसाठी खुशखबर! Volvo EX30 ची भारतात एन्ट्री; वाचा दमदार फीचर्स आणि धमाकेदार किंमत

Pune News : ससूनमध्ये रुग्णाची उडी मारून संपविले जीवन?

Mahadevi Elephant Return : कोल्हापूर ब्रेकिंग, महादेवी हत्ती परत आणण्यासाठी संयुक्त प्रस्तावाचा आदेश, हाय पॉवर कमिटी सकारात्मक, हत्ती परत येणार का?

SCROLL FOR NEXT