रांगोळीतून साकारली महालक्ष्मी
उसरघर गावातील श्रद्धा ढेपेच्या कलाकृतीचे कौतुक
माणगाव, ता. २७ (वार्ताहर)ः उसरघर गावातील श्रद्धा ढेपेने रांगोळीतून नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मीची प्रतिमा साकारली आहे. हुबेहूब जिवंत भासणाऱ्या या कलाकृतीमुळे तिचे कौतुक होत आहे.
श्रद्धाने पारंपरिक रांगोळीच्या माध्यमातून अत्यंत बारकावे टिपून देवी महालक्ष्मीची सुंदर प्रतिमा उभी केली. देवीच्या अलंकारातील झळाळी, नेत्रसौंदर्य, वस्त्रांतील रंगसंगती, चेहऱ्यावरचे तेज पाहणाऱ्यांच्या मनाला भावनिक साद घालते. गावातील महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी तिच्या या कलाकृतीचे भरभरून कौतुक केले. सामाजिक माध्यमांवरही श्रद्धाच्या रांगोळीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या उपक्रमामुळे उसरघर गावाची सांस्कृतिक ओळख वृद्धिंगत झाली आहे.