‘सकाळ करंडक’ रंगणार नोव्हेंबरमध्ये
प्रवेशप्रक्रिया सुरू; सहभागी होण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर
मुंबई, ता. २७ ः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ देणारी आणि नवोदित कलाकारांना नाट्य-चित्रपटसृष्टीकडे जाण्यासाठी दिशादर्शक ठरणारी स्पर्धा म्हणजे ‘सकाळ करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा. राज्यभरातील प्रतिभावान महाविद्यालयीन कलाकारांचा शोध घेऊन, त्यांच्या नाट्यकलागुणांना प्रकाशझोतात आणणारी ही महत्त्वाची स्पर्धा आहे. यंदा नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा रंगणार असून, प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
मराठी मातीला लाभलेला रंगभूमीच्या वैभवशाली परंपरेचा समृद्ध वारसा पुढच्या पिढीकडे सोपवण्याची जबाबदारी माध्यम समूह म्हणून आपलीदेखील आहे, या भूमिकेतून ‘सकाळ’ने या स्पर्धेचा प्रारंभ केला. अल्पावधीतच ही स्पर्धा लोकप्रिय झाली. एकापेक्षा एक सरस एकांकिकांचे सादरीकरण, तरुण कलाकारांची अफाट ऊर्जा आणि या कलाकारांना अनुभवी व ज्येष्ठ परीक्षकांकडून मिळणारे मार्गदर्शन, या वैशिष्ट्यांमुळे या स्पर्धेने वेगळी ओळख निर्माण केली आहे.
गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातील विविध केंद्रांवर ही स्पर्धा रंगणार आहे. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक आणि नागपूर या सहा केंद्रांवर स्पर्धेची विभागीय अंतिम फेरी होणार आहे. या विभागांमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या एकांकिकांची महाअंतिम फेरीसाठी निवड केली जाईल. महाअंतिम फेरीतून स्पर्धेचा ‘महाविजेता’ निवडला जाणार आहे.
मुंबईत १२, १३ नोव्हेंबरला तरुणाईचा नाट्यजल्लोष
‘सकाळ करंडक’ची मुंबई विभागाची अंतिम फेरी १२ आणि १३ नोव्हेंबरला माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात होणार आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील महाविद्यालये मुंबई विभागात सहभागी होऊ शकतील. प्रवेश घेण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर आहे. प्रवेश अर्ज आणि अधिक माहितीसाठी गणेश घोलप (८४५१८७१६६०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेची वैशिष्ट्ये
- विद्यार्थ्यांना भरघोस रकमेची पारितोषिके
- रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या दिग्गज कलाकारांकडून स्पर्धेचे परीक्षण
- कुठेही सादर न झालेली एकांकिका पाहण्याची संधी
- स्पर्धेपूर्वी अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन
- स्पर्धेतील आश्वासक कलाकारांना स्पर्धेनंतरही मार्गदर्शन
एकांकिका स्पर्धांमधूनच उत्तम कलाकार पुढे येत असतात. त्यांना केवळ योग्य व्यासपीठाची आणि योग्य दिशा दाखवण्याची गरज असते. ‘सकाळ करंडक’ ही महाराष्ट्रातील एक मानाची आणि महत्त्वाची स्पर्धा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले तरुण कलाकार या स्पर्धेतून घडले आणि पुढे मालिका, चित्रपटांमध्ये यशस्वी झाले. यापुढेही असे कलाकार पुढे येतील, याची खात्री आहे.
- महेश मांजरेकर, ज्येष्ठ लेखक- दिग्दर्शक- अभिनेते