अवघी दुमदुमली श्रीमलंगगड नगरी
ललिता पंचमी उत्साहात साजरी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २७ ः नवरात्रीच्या पाचव्या माळेला श्री मलंगगडावर वारकऱ्यांची दरवर्षी मोठ्या उत्साहात दिंडी जाते. शुक्रवारी (ता. २६)देखील ठाणे-रायगड जिल्ह्यातील वारकऱ्यांनी श्री मलंगगडावर पायी दिंडीचे प्रस्थान केले होते. श्री मलंगगड वाडीतील प्राचीन दत्त मंदिरापासून या दिंडीचे प्रस्थान झाले तर श्री मलंगमत्स्येंद्रनाथांच्या मंदिरात महाआरती करून या दिंडीची सांगता करण्यात आली.
कल्याणजवळील श्री मलंगगडावर शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ललिता पंचमी उत्सव सुरू केला होता. नवरात्रीच्या पाचव्या माळेला मोठ्या संख्येने दरवर्षी वारकरी टाळ, मृदंगाचा गजर आणि रामनाम म्हणत श्री मलंगगडावर जात असतात. यंदादेखील त्याच उत्साहात मोठ्या संख्येने वारकरी या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त श्री मलंगगडावर व पायथ्याशी तैनात केला होता. तर वारकऱ्यांचे श्रीमलंगगडच्या पायथ्याशी आलेल्या शिवसेना शाखेसमोरील रिंगण आणि श्री मलंगनाथांच्या समाधी मंदिरासमोरील रिंगण हे दरवर्षी आकर्षण असते. त्यामुळे या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ठाणे, रायगड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने वारकरी दरवर्षी श्री मलंगगडावर येतात. सोहळ्याला हिंदू मंच अध्यक्ष दिनेश देशमुख, महंत भाईनाथ महाराज, अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे कोकण प्रांत अध्यक्ष विश्वनाथ महाराज वारिंगे, आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री यांसह राजकीय मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
श्री मलंगगडावर सुरू केलेली आनंद दिघेंची वारी वारकऱ्यांनी जोपासली आहे. मोठ्या संख्येने ललिता पंचमीच्या दिवशी भल्या पहाटे वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात येत असते. शुक्रवारी सकाळी सात वाजता दिंडीचे श्री मलंगगडावर प्राचीन दत्त मंदिरातून प्रस्थान झाले होते. या दिंडी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार राजेश मोरे, डॉ. बालाजी किणीकर, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख महेश गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य श्याम पाटील, माजी सरपंच चैनू जाधव, श्री मलंगगड मंडळ अध्यक्ष समीर भंडारी, सचिन बासरे यांसह अन्य राजकीय मंडळीदेखील उपस्थित होती.