शहाड पुलावर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी
मनसेचे रास्ता रोको आंदोलन
डोंबिवली, ता. २७ ः शहाड पुलावरील दुरवस्थेमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पुलावर प्रचंड खड्डे पडल्यामुळे वाहतुकीची गती मंदावली असून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होते. त्यामुळे नागरिकांना तासन्तास वाहतुकीत अडचण सहन करावी लागते. याचबरोबर या खड्ड्यांमुळे अनेक अपघातही होत असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. वारंवार प्रशासनाकडे समस्या मांडली तरीही कोणतेही ठोस उपाय न झाल्याने मनसेच्या वतीने शुक्रवारी (ता. २६) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
कल्याण-नगर महामार्गावरील हा पूल १९८७ मध्ये बांधण्यात आला असून सध्या ३०-३५ वर्षांचा झालेला आहे. पुलाचा अरुंद रस्ता आणि खराब अवस्थेमुळे वाहतुकीला मोठा त्रास होत आहे. मनसे जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख यांनी सांगितले, की या पुलाचा स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे, कारण त्याच्या खराब अवस्थेमुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती आहे. पुलावरील कठडे तुटलेले आहेत, तसेच दुरुस्तीची गरज तातडीने भासते.
मनसेच्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, शहराध्यक्ष संजय घुगे, विभागाध्यक्ष अक्षय धोत्रे, प्रशांत संगाळे, कैलास घोरपडे, प्रमोद पालकर, सुहास बनसोडे, उपविभागाध्यक्ष अमित सिंग यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. त्यांनी प्रशासनाकडे निवेदन दिले, ज्यात खड्डे त्वरित भरून वाहतुकीसाठी रस्ता सुस्थितीत करण्याची आणि नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलकांना आश्वासन
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता सूर्यवंशी यांनी आंदोलकांना आश्वासन दिले, की १५ ऑक्टोबरपर्यंत पुलाच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येतील; मात्र या पुलाची संपूर्ण स्थिती तपासण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यातील अपघात टाळता येतील. शहाड पुलाचा दुरुस्तीसाठी आणि नवीन पुलासाठी लवकरच ठोस निर्णय घेणे गरजेचे असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा आहे.