कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा
कल्याण (वार्ताहर) ः कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची २०२४-२५ची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. २६) पार पडली. सभेला समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे, उपसभापती जालिंदर पाटील, विविध संचालक, तसेच शेतकरी, व्यापारी, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी शेतकरी व व्यापाऱ्यांनी पाणी, वीज, रस्ते व स्वच्छतेसंदर्भातील समस्या मांडल्या. यावर उत्तर देताना सभापती घोडविंदे यांनी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. माथाडी कामगार भवनासाठी पाठपुरावा केला जाईल, तसेच स्वच्छतेसाठी खासगी कंपनीला ठेका दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. उपबाजार सुरू करण्यासाठीदेखील प्रयत्न होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सचिव संजय एगडे यांनी वार्षिक अहवाल वाचून दाखवला. या सभेमुळे शेतकरी व व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून त्यावर ठोस उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
................................
महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त सांस्कृतिक मेजवानी
कल्याण (वार्ताहर) ः कल्याण-डोंबिवली महापालिकेचा ४२वा वर्धापनदिन बुधवारी (ता. १ ऑक्टोबर) आहे; मात्र विजयादशमी गुरुवारी (ता. २)ला असल्यामुळे वर्धापनदिनाचा मुख्य कार्यक्रम मंगळवारी (ता. ७) आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी दुपारी तीननंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे नेतृत्व मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. यामध्ये महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी विविध सांस्कृतिक सादरीकरण करणार आहेत. याचबरोबर १ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिकदिन साजरा केला जातो. यानिमित्त बुधवारी (ता. ८) ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण पश्चिम येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. विशेष म्हणजे, या दिवशी ज्येष्ठ नागरिकांनीच ज्येष्ठांसाठी कार्यक्रमांची मांडणी केली आहे. हास्यकवी संमेलन हेदेखील आकर्षण ठरणार आहे. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना व्यासपीठ मिळणार असून महापालिकेच्या वर्धापनदिनाला खास रंगत येणार आहे.
..............................................
कल्याण सूचक नाका परिसरातील शौचालयांची दुरवस्था
कल्याण (वार्ताहर) ः पूर्वेतील सूचक नाका परिसरात महापालिकेच्या शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. येथे सुमारे २५ शौचालये असून त्यातील केवळ एकच चालू अवस्थेत आहे. परिणामी, नागरिकांना सकाळी कामावर जाताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यावर पालिका दुर्लक्ष करीत असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मनोज वाघमारे यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. त्यांनी टूथब्रश आणि टमरेल घेऊन थेट आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केले; मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले. वाघमारे यांनी सांगितले, की स्मार्ट सिटीच्या नावाखाली महापालिका जाहिरात करत असली तरी मूलभूत सुविधा पुरवण्यात ती अपयशी ठरत आहे. यापूर्वी अनेक वेळा प्रभागात तक्रारी करूनही पालिकेने काहीच कारवाई केली नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. शौचालये नीट चालू ठेवावीत आणि स्वच्छता राखावी, अशी नागरिकांची मागणी आहे. प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून समस्या सोडवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
.........................................
मतचोरीविरोधात युवक काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम
कल्याण (वार्ताहर) ः युवक काँग्रेसच्या वतीने कल्याण पश्चिम येथे मतचोरीविरोधात जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. सध्या देशात मोदी सरकारच्या काळात मतांची चोरी होत असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने हे अभियान उभे केले. जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग माटा यांच्या नेतृत्वाखाली आणि कोकण विभाग प्रभारी शांभवी शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली मोहीम पार पडली. या मोहिमेत नागरिकांनी लॉलीपॉप व गाजर दाखवत सरकारचा निषेध केला, तसेच स्वाक्षऱ्या करून आपला रोष व्यक्त केला. मोहिमेत युवक काँग्रेसचे पदाधिकारी मेहेर चौपाने, सचिन पोटे, कांचन कुलकर्णी, नवीन सिंग, वैशाली वाघ, कोमल भोसले, विमलेश विश्वकर्मा, विनू जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी मोदी सरकारवर लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवर घाला घालण्याचा आरोप केला. या मोहिमेद्वारे लोकांमध्ये मतांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे हे मुख्य उद्दिष्ट होते. युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्यामुळे या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.
..........................