विरार, ता. २७ (बातमीदार) ः माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याने सार्वजनिक बांधकाम विभाग, पालिका व आरटीओ प्रशासनाची झोप उडाली आहे. विरार फाटा-नारंगी मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न चर्चेच्या टेबलवर पोहोचताच सार्वजनिक बांधकाम विभागाने रात्री-अपरात्री रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे; परंतु प्राथमिक चर्चेत तीनही प्रशासनांत समन्वयाचा प्रचंड अभाव दिसून आला आहे. रस्ता दुरुस्तीचे काम पुढील दोन दिवसांत काम पूर्ण होईल, असे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे.
विरार प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर गॅसवाहिनी अंथरण्याच्या कामादरम्यान पडलेल्या खड्ड्यात अडखळून प्रताप नाईक यांचा मागून आलेल्या भरधाव टँकरखाली चिरडून मृत्यू झाला होता. मागील पाच वर्षांत या रस्त्यावर अशाच पद्धतीच्या अनेक अपघातांत नागरिकांना प्राण गमावलेले आहेत. सततच्या अपघातांमुळे नागरिकांत संतापाचा भडका उडालेला आहे. हा जनक्षोभ लक्षात घेऊन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने उद्या (ता. २८) आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला होता. तत्पूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाला चर्चेसाठी पाचारण केले होते. यासंदर्भात विभागाच्या वसई येथील कार्यालयात मॅरेथॉन चर्चा झाली. पुढील लढा न्यायालयात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेश कदम यांनी दिली.